लाडू म्हंटल की आपल्या प्रत्येकांच्या घरांमध्ये सर्वात आवडत्या पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक आहे. सण असो, पूजा असो घरात एक गोड पदार्थ म्हणून प्रत्येक प्रसंगी लाडू बनवले जातात. मात्र लाडू बनवताना त्यात सारखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे आजच्या बदलत्या जीवनशैलीत लोकं अधिक आरोग्यदायी आणि कमी साखर असलेले पदार्थ खात असतात.
नाचणी, मखाना, ओट्स , तीळ, नारळ आणि केळी यांसारख्या पौष्टिक घटकांचा वापर करून शुगर फ्री लाडू बनवता येतात. त्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रथिने, आरोग्यदायी फॅट्स आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. हे घटक माफक प्रमाणात वापरून यापासून बनवलेले लाडू शरीराला ऊर्जा देण्यास, जास्त वेळ पोट भरलेले ठेवण्यास आणि संतुलित आहाराचा भाग बनण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात की घरी शुगर फ्री पद्धतीने आरोग्यदायी लाडू कसे बनवायचे ते किती दिवस स्टोअर करू शकता आणि बनवताना कोणती खबरदारी घ्यावी.
हे आहेत 5 शुगर फ्री व पौष्टिक लाडू
नाचणीचे लाडू
एका कढईत थोडे तुप टाकून त्यात नाचणीचे पीठ हलके परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये खजूर कुस्करून आणि थोडी वेलची पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा व त्याचे छोटे लाडू बनवा. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते, जे हाडांचे आरोग्य राखण्यास आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
मखाना लाडू
मखाने हलके भाजून घ्या आणि वाटून घ्या. त्यात खजुर, थोडा बारीक वाटलेला नारळ आणि वेलची पूड टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून लाडू बनवा. मखाने हे कॅल्शियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानले जातात. हा एक हलका, चविष्ट आणि पोट भरणारा आरोग्यदायी नाश्ता आहे.
ओट्स आणि केळीचे लाडू
ओट्स हलके भाजून घ्या आणि दळून घ्या. त्यात एक पिकलेले केळे चांगले कुस्करून आणि थोडा खोबऱ्याचा कीस घालून छोटे लाडू बनवा. हवे असल्यास, तुम्ही ते काही काळासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता. ओट्स आणि केळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ते एक पौष्टिक पर्याय ठरतात.
नारळ आणि खजूर लाडू
खजुराच्या बिया काढून ते तुम्ही बारीक किसलेल्या नारळामध्ये (सुक्या नारळाचा देखील वापर करू शकता)टाकून आणि चांगले मळून घ्या. त्यानंतर त्याचे लहान लाडू बनवा. नारळामध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर असतात, तर खजूर नैसर्गिक गोडवा आणि ऊर्जा देतात. शुगर फ्री चविष्ट गोड पदार्थासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मूग डाळ लाडू
मूग भाजून बारीक वाटून घ्या. या मिश्रणात थोडे तूप आणि खजुर बारीक वाटून मिश्रणात मिक्स करून लाडू बनवा. मूग प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे, तर खजुरामुळे नैसर्गिक गोडवा येतो. हा एक पौष्टिक आणि पोट भरणारा नाश्ता असू शकतो.
हे लाडू किती दिवसांसाठी आणि कसे साठवून ठेवावेत?
शुगर फ्री लाडू पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा. जर केळी किंवा ताज्या नारळाचा वापर केला असेल तर ते फ्रिजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसांच्या आत खाणे उत्तम.
दरम्यान, नाचणी, मखाना किंवा मूग डाळ यांसारख्या घटकांपासून बनवलेले लाडू फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात सुमारे 5 ते 7 दिवस ठेवता येतात. लाडू नेहमी कोरड्या, स्वच्छ चमच्याने किंवा हातानेच काढावेत आणि त्यांचा ताजेपणा व चव टिकवून ठेवण्यासाठी ते जास्त वेळ उघडे ठेवणे टाळावे.
लाडू बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
लाडू बनवण्यासाठी नेहमी ताजे आणि चांगल्या प्रतीचे साहित्य वापरा. साखरेऐवजी खजूर, केळी किंवा इतर नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा. तुपाचा वापर जपून करा आणि पदार्थांमधील पोषक तत्वे टिकवून ठेवण्यासाठी ते जास्त वेळ परतवू नका.
लहान मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी लाडू बनवत असाल तर, ते मऊ ठेवा आणि त्यानुसार साहित्य निवडा. लाडू स्वच्छ हातांनी बनवा आणि ते दीर्घकाळ सुरक्षित व चविष्ट राहावेत यासाठी व्यवस्थित ठेवा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)