काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा मोठा प्लॅन,’भाजपकडून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न’; मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा गंभीर आरोप | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भाजपवर नेशनल कॉन्फरन्सचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

News18
News18

जम्मू: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) त्यांच्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेशनल कॉन्फरन्स (NC) पक्षात फूट पाडून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, पक्षाच्या आमदारांना पैशांचे आमिष आणि मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

शनिवारी श्रीनगरमधील हजरतबल येथे त्यांच्या आजी अकबर जहाँ यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आमदारांना पैशांचे आणि मंत्रिपदाचे आमिष

सुरुवातीला पैशांचे आमिष आणि मंत्रिपदाची ऑफर देऊन नेशनल कॉन्फरन्सचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश न आल्याने आता वेगळ्याच पद्धतीने आमदारांशी संपर्क साधला जात आहे. काही आमदारांना आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ, असे आश्वासन दिले जात असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला.

20 ते 30 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जम्मू विभागातील नेशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराने त्यांना स्वतः ही माहिती दिली आहे. त्या आमदाराला भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने संपर्क साधला. संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातील वकीलही असल्याचा दावा त्यांनी केला. त्या आमदाराला भाजपमध्ये येण्यासाठी 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार विकले जाणार नाहीत

उमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नेशनल कॉन्फरन्सचे आमदार कोणत्याही परिस्थितीत स्वतःला विकणार नाहीत. आमच्या पक्षातील एकही आमदार 20 कोटी, 30 कोटी किंवा 100 कोटी रुपयांसाठी आपली निष्ठा विकणार नाही. आम्हाला शेवटी देवासमोर उत्तर द्यायचे आहे, याची जाणीव आम्हा सर्वांना आहे.

भाजपवर थेट निशाणा

भाजपवर टीका करताना उमर अब्दुल्ला म्हणाले की, मागच्या दाराने सत्ता मिळवता येईल, असा गैरसमज करू नका. आमचा पक्ष इतका कमकुवत नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करत नेशनल कॉन्फरन्स मजबूत असल्याचा दावा केला.

दरम्यान उमर अब्दुल्ला यांनी केलेल्या या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांनंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

मराठी बातम्या/देश/

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा मोठा प्लॅन,’भाजपकडून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न’; मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा गंभीर आरोप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *