आईला दवाखान्यातून घरी सोडलं, काही वेळातच सपासप वार… कल्याण हादरलं – Marathi News | Kalyan Mharal Murder: Man Stabbed After Bringing Mother Home; Police Hunt Killer


कल्याणजवळील म्हारळ गाव परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला दवाखान्यातून उपचार करून सुखरूप घरी आणणाऱ्या 36 वर्षीय तरुणाची काही वेळातच अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे. रवींद्र आहिरे असे मृत तरुणाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. या घटनेमुळे म्हारळ गाव परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून टिटवाळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

कल्याणजवळील म्हारळ गावातील मलखन कंपाऊंड परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मृत रवींद्र आहिरे हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते आणि एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, काल 7 च्या सुमारास त्यांच्या आईला अचानक त्रास जाणवू लागल्याने रवींद्र यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात नेले. उपचारानंतर आईला सुखरूप घरी आणून सोडले. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी ते पुन्हा घराबाहेर पडले.

अंधारात दबा धरून बसले

दरम्यान, मलखन कंपाऊंड परिसरात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपीने धारदार शस्त्राने रवींद्र यांच्या पोटात सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात पाठवण्यात आला असून, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा तपास सुरू आहे. पूर्ववैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक वाद या सर्व शक्यतांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या खळबळजनक हत्येनंतर मारळ गाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. टिटवाळा पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *