Thane News: पब्जीत हरल्याने उडवली खिल्ली, मित्रानेच रागाच्या भरात केलं असं काही की संपूर्ण ठाणे हादरलं! | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Thane Crime News: मोबाईलवरील ‘पब्जी’ (PUBG) गेम खेळताना पराभूत झाल्यानंतर मित्रांनी केलेल्या मस्करीचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाला.

पब्जीत हरल्याने उडवली खिल्ली, मित्रानेच रागाच्या भरात केलं असं काही की संपूर्ण ठाणे हादरलं!
पब्जीत हरल्याने उडवली खिल्ली, मित्रानेच रागाच्या भरात केलं असं काही की संपूर्ण ठाणे हादरलं!

ठाणे: मोबाईलवरील ‘पब्जी’ (PUBG) गेम खेळताना पराभूत झाल्यानंतर मित्रांनी केलेल्या मस्करीचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट भागात घडली आहे. या भ्याड हल्ल्यात पीडित मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील वाल्मिकीपाडा गार्डनमध्ये तक्रारदार मुलगा आणि त्याचे समवयस्क मित्र शुक्रवारी एकत्र बसून मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते. या खेळात एका मित्राचा पराभव झाला. खेळ संपल्यानंतर नेहमीप्रमाणे इतर मित्रांनी पराभूत झालेल्या मित्राची चेष्टा-मस्करी करायला सुरुवात केली.

हा अपमान सहन न झाल्याने तो मित्र प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात चाकू आणण्यासाठी धावला. मात्र, वेळीच त्याच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत त्याला समजावून घरी नेल्याने त्या दिवशी पुढील अनर्थ टळला आणि वातावरण शांत झाले.

रात्रीच्या अंधारात गाठून सपासप वार

शुक्रवारचा वाद मिटला असे वाटत असतानाच, १२ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हा रागाचा दुर्दैवी शेवट झाला. रामनगर येथील रबर कंपनीजवळ तक्रारदार मुलगा त्याच्या काही मित्रांसोबत उभा होता. याच दरम्यान, शुक्रवारी चेष्टा केलेला तो मित्र त्याच्या इतर दोन साथीदारांसह एकाच दुचाकीवरून (Double Seat) तेथे आला.

काही समजण्याच्या आतच, दुचाकीवरून आलेल्या त्या तिघांपैकी दोघांनी तक्रारदार मुलावर अचानक धारदार चाकूने हल्ला चढवला. त्यांनी पीडित मुलाच्या छातीवर, पोटावर आणि हातावर सपासप जबरदस्त वार केले.

आरोपी फरार; श्रीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला सोडून तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतच पीडित मुलाने कसेबसे आपले घर गाठले. मुलाची अवस्था पाहून कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धावपळ करत त्याला लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिसांनी तातडीने दखल घेत तिन्ही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या फरार अल्पवयीन आरोपींचा आणि त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. मोबाईल गेमच्या नादापायी अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती या घटनेमुळे पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Thane News: पब्जीत हरल्याने उडवली खिल्ली, मित्रानेच रागाच्या भरात केलं असं काही की संपूर्ण ठाणे हादरलं!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *