Sanjay Raut: जयंत पाटील अन् तावडेंची भेट; आमदार वेगळ्या विचारात? चर्चांना उधाण, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘माझं सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं…’


मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या पक्षातील काही आमदार आणि खासदारांनी पक्षातंर केलं, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि भाजपा नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी देखील संताप व्यक्त केला होता, त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे, यावेळी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, मी इतकंच सांगेन माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, बाकी मग शिंदे गट अजित पवार गट हे अमित शहांचे पक्ष आहेत. आता त्यांच्या पक्षामधल्या काय कुरबुरी आहेत, कोण कोणाला आव्हान देतं, त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांना का बोलावं? असंही त्यांनी म्हटलं आहे.(Sanjay Raut)

Sanjay Raut: काही दिवसापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणं झालं…

तर, नक्कीच शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे, शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे आमचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या घडामोडींवर आमच लक्ष असणं हे साहजिकच आहे. काही दिवसापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी इतकच सांगितलं की जे काही प्रसिद्ध होतंय, जे काही येतं आहे, या सगळ्या अफवा आहे. या सर्व अफवा आहेत, अर्थात सगळेच पक्ष या वेळेला अडचणीतून प्रवास करतायत शिवसेनेपुढे अडचणी आहेत शरद पवार साहेबांपुढे अडचणी आहेत, सुनेत्रा पवार जो गट सांभाळता आहेत, त्यांच्यासमोर अडचणी आहेत, इतकंच कशाला मिंदे गटामध्ये अडचणी आहेत, भाजपात अडचणी आहेत, आणि कोणाकडे प्रचंड बहुमत असलं म्हणजे त्या पक्षात अडचणी नाहीत असं म्हणता येणार नाही, दिल्लीमध्ये अडचणी सुरू आहेत, आम्ही आमच्या पक्षापुरत बोलू  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल आणि आम्ही पुढे जाऊ याच्यावरती आम्ही काम करू आणि माननीय शरद पवार साहेब महाविकास आघाडीतले
महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढेच मी सांगतो असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.(Sanjay Raut)

Sanjay Raut: प्रत्येक अडचणी मागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती

पुढे बोलताना राऊत म्हणाले, अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून, जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं. तसं या प्रत्येक अडचणी मागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे, ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थर यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी, असं त्यांना वाटत नाही, असंही ते पुढे म्हणालेत.

Sanjay Raut: जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर….

 मध्यंतरीच्या काळात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती, त्यानंतर आता जयंत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी काही त्यांची कैफियत मांडली, निधी, सत्ता असेल या संदर्भातली आपली मत मांडली आहेत आणि जयंत पाटील हे शरद पवारांकडे आमदारांची भूमिका मांडणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावरती उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, जयंतराव पाटील हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या भूमिकेत काम करणारे नेते आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचाही पगडा आहे, ते ज्या भागातून येतात तो एक क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य चळवळीतला मोठा भाग आहे आणि जयंतराव त्याच मुशीत तयार झालेले आहेत, जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूलाही वाटणार नाही आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची ते आता जे कोणी आहेत, विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता आहे, त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन, ते काही वेगळा विचार करतील असं नाही, आणि आता आर आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत, त्यानंतर असे अनेक आमदार आहेत, जरी संख्या दहा असली तरी त्यांच्यातले बहुसंख्य आमदार याच विचाराचे आहेत, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे आहेत, ते कोणता असा निर्णय घेतील असं वाटतं नाही, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *