Jayant Patil and Suresh Dhas: राज्यात दूध भेसळ (Milk Adulteration) आणि दूध संकलन (Milk Collection) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या कारवाईनंतर हा विषय चर्चेत आला. या प्रकरणाचे धागेदोरे बीड (Beed) जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू असतानाच, विधानसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
Jayant Patil and Suresh Dhas: जयंत पाटील यांनी नेमके काय आरोप केले?
जयंत पाटील यांनी सभागृहात बोलताना बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्नीविरोधात गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, संबंधित महिला डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनाही निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचे आरोप त्यांनी केले. याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचाही मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला. संबंधित प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका या माध्यम संस्थेला धमक्या दिल्या जात असल्याचे, तसेच संबंधित आमदाराची पत्नी संपादकांना थेट फोन करून दबाव आणत असल्याचे ऐकिवात असल्याचा दावा त्यांनी केला. ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्यांनी कोणत्याही आमदाराचे किंवा त्यांच्या पत्नीचे नाव सभागृहात घेतले नाही.
Jayant Patil and Suresh Dhas: सुरेश धस संतापले
जयंत पाटील यांच्या या आरोपांनंतर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट प्रत्युत्तर दिले. बीडमधील मच्छिंद्रनाथ गड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयंत पाटलांना जाहीर इशारा दिला. सुरेश धस म्हणाले, “जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे बीडमध्ये नाही.”
यानंतर त्यांनी आणखी टीका करत म्हटले, “तुम्हाला पाहून बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. देवाने तुम्हाला जेवढे डोकं दिले आहे, त्यापेक्षा एक टक्का आमच्या देवाने आम्हाला जास्त डोकं दिले आहे. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचण्याचे काम करताय, मग आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू.”
Jayant Patil and Suresh Dhas: जिओ टॅगिंगचा मुद्दाही काढला
जयंत पाटलांना उत्तर देताना सुरेश धस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, “मविआ सरकारच्या काळात कोण जलसंपदा मंत्री होते? ज्यांच्या कालावधीत ‘जिओ टॅगिंग’चा जीआर काढला गेला आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी लूट झाली. हा नेमका काय प्रकार होता, हे येत्या पुढच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी सर्वांसमोर आणणार.”
Jayant Patil and Suresh Dhas: ‘महालक्ष्मी’ संस्था नेमकी कोणाची आहे?
यावेळी सुरेश धस यांनी ‘महालक्ष्मी’ नावाच्या संस्थेचाही उल्लेख करत पुढील अधिवेशनात मोठे खुलासे करण्याचा दावा केला. धस म्हणाले, “महालक्ष्मी सारखी संस्था नेमकी कोणाची आहे? त्याचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे? त्या संस्थेमध्ये कोणाचा किती वाटा आहे आणि तिचे डायरेक्टर कोण कोण आहेत? ही सगळी माहिती आणि कुंडली मी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाहेर काढणार,” असा इशारा देखील त्यांनी दिला.
Jayant Patil and Suresh Dhas: आमचा धंदा कोणाला दम द्यायचा नाही
“जयंत पाटील यांनी जावाई शोध लावला आहे. मी सभागृहात नव्हतो, बाहेर होतो. मी अध्यक्षांना परवानगी मागितली. पण मला परवानगी दिली नाही. त्यांनी असा कयास मांडला की तुकाराम मुंढे यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्या बैठकीत मोठ्या पावडर ब्रँडचा व्यक्ती असं म्हणाला की सुरेश धस यांची पत्नी दम वगैरे असे त्यांनी सांगितले. आमचा धंदा कोणाला दम द्यायचा नाही. माझा असेल पण माझ्या पत्नीचा नाही. आमचं पंधरा वर्षापासून त्या संभाव्य प्लांटला दूध नाही. आमच्या स्थानिक विरोधकांचे दूध मात्र तिकडे जातं. मग विरोधी प्लांट वाल्यांच्या कुणीतरी सौभाग्यवती किंवा कोणी फोन केला असेल. आमचे फक्त नेसले व मदर डेरी यांनाच दूध जातं. जे कोणी तथाकथित दूध पावडर प्लांटवाले तुकाराम मुंढे यांच्या बैठकीत बोलले आसतील त्यांनी मिडीया समोर येऊन बोलावे , त्यांनी सांगावे की सुरेश धस यांच्या पत्नीने मला फोन केला व त्यांनी एफआयआर करावा. त्यानंतर चौकशी होईल,” अशी देखील प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिलीय.
Jayant Patil and Suresh Dhas: पुढील अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष
दूध भेसळ, दूध संकलन, जिओ टॅगिंग आणि ‘महालक्ष्मी’ संस्थेबाबत करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस यांनी दिलेले आक्रमक प्रत्युत्तर आणि पुढील अधिवेशनात मोठे खुलासे करण्याचा इशारा यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया