Shapoor Zadran Passes Away : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरान यांचे मंगळवारी दीर्घ आजारानंतर भारतात निधन झाले. 38 वर्षीय जादरान यांनी नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते स्टेज-4 हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस (HLH) या दुर्मिळ आणि गंभीर प्रतिकारशक्तीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. विशेष म्हणजे, त्यांच्या 39 व्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. शापूर जादरान यांच्या निधनाने अफगाणिस्तान क्रिकेटसह जागतिक क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक विद्यमान आणि माजी अफगाण क्रिकेटपटू उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज आणि इतर अनेक खेळाडू शपूर यांना अखेरचा निरोप देताना भावूक झाल्याचे दिसत आहे.
राशिद खानची भावनिक पोस्ट
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने इन्स्टाग्रामवर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या जिवलग मित्राला श्रद्धांजली वाहिली. राशिदने लिहिले, “अत्यंत जड अंतःकरणाने मी माझ्या एका अतिशय खास मित्राला निरोप देत आहे. तुझ्यासोबतचे हास्य, आठवणी आणि प्रत्येकाविषयी असलेले प्रेम कायम लक्षात राहील. तुझ्याशिवाय आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहणार नाही. माझ्या हृदयात तुझी जागा कायम राहील. माझ्या प्रिय मित्रा, शांततेत विसाव. पुन्हा भेटू.”
अफगाणिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद नबी यांनीही शापूर जादरान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नबी यांनी लिहिले, “शपूर भाऊ, अल्लाह तुम्हाला आपल्या अमर्याद कृपेचा वर्षाव करो आणि जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. तुमच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. तुम्ही फक्त माझे जवळचे मित्र नव्हता, तर अफगाणिस्तानचे खरे सेवक आणि देशाचा अभिमान होता.”
Seeing Rashid Khan, Mohammad Nabi, Rahmanullah Gurbaz, Ibrahim Zadran, Hashmatullah Shahidi, Azmatullah Omarzai, Rahmat Shah, Hamid Hassan, Nawroz Mangal, and so many other Afghan cricketers in tears as they waited for the late Shapoor Zadran’s coffin to be brought out of the… pic.twitter.com/bPSf2tI6Hw
— Fazal Afghan (@fhzadran) July 8, 2026
इतर खेळाडूंकडूनही श्रद्धांजली
अष्टपैलू अजमतुल्लाह उमरजई यांनी शपूर यांच्या निधनाला अफगाणिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो, अशी प्रार्थना केली. सलामीवीर इब्राहिम जादरान यांनी लिहिले की, अफगाणिस्तान क्रिकेटच्या संघर्षमय सुरुवातीच्या काळातील शपूर हे खरे नायक होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी फलंदाज रहमत शाह यांनीही इस्लामिक आयत शेअर करत शपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रवि शास्त्रींनीही व्यक्त केला शोक
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही शपूर जादरान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. शास्त्री म्हणाले, “शापूर जादरान यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. खेळाप्रती त्यांची निष्ठा आणि समर्पण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि संपूर्ण अफगाणिस्तान क्रिकेट समुदायाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.”
अफगाणिस्तान क्रिकेटमधील महत्त्वाचे योगदान
शपूर जादरान यांनी 2009 ते 2020 या कालावधीत अफगाणिस्तानकडून 44 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. अफगाणिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या सुरुवातीच्या खेळाडूंमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या आक्रमक गोलंदाजीमुळे आणि संघासाठीच्या योगदानामुळे ते अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचे नाव म्हणून कायम स्मरणात राहतील.
हे ही वाचा –