How Team India can qualify for LA 2028 Olympics : लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार असून पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी सहा संघांना संधी मिळणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पात्रता प्रक्रियेचे नियम आधीच स्पष्ट केले आहेत. सध्या भारतीय संघ आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असल्याने ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने पहिले तीन सामने गमावल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. भारताचे अव्वल स्थान धोक्यात आले असून, त्याचा फटका ऑलिम्पिकच्या थेट पात्रतेलाही बसू शकतो.
कामगिरी घसरली तर थेट पात्रतेचे स्वप्न भंगू शकते
आयसीसीच्या नियमानुसार पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी यजमान देश अमेरिका (USA) आधीच थेट पात्र ठरला आहे. उर्वरित पाच जागांपैकी आशिया, युरोप, आफ्रिका आणि ओशिनिया या चार खंडांतील वर्षअखेर (2026) पर्यंतच्या टी-20 क्रमवारीतील अव्वल संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. सहाव्या संघाची निवड स्वतंत्र पात्रता स्पर्धेतून होईल. सध्या आशियातील सर्वोच्च क्रमांकाचा संघ भारत आहे. भारतीय संघाचे 269 रेटिंग गुण असून तो जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. मात्र, अलीकडील खराब कामगिरी कायम राहिली आणि क्रमवारीत घसरण झाली, तर पाकिस्तानला त्याचा फायदा होऊ शकतो.
सध्या पाकिस्तान 240 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. वर्षअखेरीस पाकिस्तानने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आणि भारताची घसरण सुरूच राहिली, तर आशियातील अव्वल संघ म्हणून पाकिस्तान थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. त्यामुळे भारतासाठी आगामी प्रत्येक टी-20 मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भारताचे आगामी टी-20 वेळापत्रक
इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला 2026 अखेरपर्यंत आणखी चार द्विपक्षीय टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमधील निकाल भारताच्या टी-20 क्रमवारीवर मोठा परिणाम करू शकतात.
- जुलै अखेर: झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 3 सामन्यांची मालिका.
- ऑक्टोबरच्या सुरुवातीला: भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची मालिका.
- ऑक्टोबर-नोव्हेंबर: न्यूझीलंड दौऱ्यावर 5 सामन्यांची टी-20 मालिका.
- वर्षअखेरीस: श्रीलंकेविरुद्ध भारतात 3 सामन्यांची मालिका.
या सर्व मालिकांमधील भारताची कामगिरी केवळ टी-20 क्रमवारीसाठीच नव्हे, तर 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अपयश मागे टाकत भारतीय संघाला लवकरात लवकर विजयी मार्गावर परतणे आवश्यक आहे. अन्यथा, ऑलिम्पिकचे थेट तिकीट हुकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
हे ही वाचा –