मी दोषी आढळलो तर सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या..! एकनाथ शिंदेंच्यावर आरोपांवर बांदेकर भडकले | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्यासंदर्भात जे आरोप केले त्यावर आदेश बांदेकर यांनी उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सराकारच्या काळात आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते.

News18
News18

राम मंदिरातील दानपेटीच्या लुटीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीका करणाऱ्यांच्या सरकारमध्ये सिद्धिविनायकाची दानपेटी लुटली गेली’ असा थेट आरोप केला. तेव्हा चौकशी करण्याचे आदेश का दिले नाहीत, असा सवालही उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेव्हा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये जे आरोप केले त्यावर आदेश बांदेकर यांनी उत्तर दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “मी आता वारीमध्ये आहे. त्यामुळे मी व्यवस्थित पाहिलेलं नाही. माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष झाली आहेत. आता तीन वर्षांत जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांच्याचकडे सगळा कारभार होता. साडेतीन-चार वर्षांआधी विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचा हाच विषय अधिवेशनात आला होता. सिद्धिविनायकची जी यंत्रणा आहे त्या मंदिराच्या यंत्रणेमध्ये जे कार्यकारी अधिकारी असतात ते मंत्रालयानं डेप्युट केलेले असतात. जे कार्यकारी अधिकारी, फायनान्स ऑफिसर हाही मंत्रालयानं डेप्युट केलेला असतो. त्यामुळे शासकीय कारभारातून कोणताही गैरव्यवहार आढळला असेल तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे.”

दोघी आढळलो तर मंदिरासमोर मला फासावर द्या असं म्हणत बांदेकरांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “कोणत्यातरी बातम्यांवर कोणतीतरी गोष्ट उगाच आपटून त्याला काही अर्थ नाही. जर खरंच त्यात काही आढळलं असेल तर साडेतीन वर्ष झालेली आहेत. या वर्षात कोण अध्यक्ष आहे हे सर्वांना माहिती आहे. मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. जर त्यात कोणीही दोषी आढळलं अगदी मीही आढळलो तरी मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या. पण उगाच खोटेनाटे आरोप करू नका.”

“सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्यावर विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा. मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे मी इथून सांगतोय आमच्या कार्यकाळात एक जरी गोष्ट चुकीची घडली असेल तर मला फासावर द्या.”

बांदेकर पुडढे म्हणाले, “आणखी एक गोष्ट, उगाच धूर बघून आग लागली आहे असं काही करू नका. व्यवस्थित चोख कारभार करा. स्वत:चे गैरव्यवहार लपवण्यासाठी उगाच काहीतरी आरोप करून दिशाभूल करत राहायचं असं करू नका. जर काही चुकीचं आढळलं असेल तर पाहिजे ती कारवाई करा.”

“माझा सहा वर्षांचा कार्यकाळ होता. पहिले तीन वर्ष जनता पक्षाचेच सदस्य माझ्याबरोबर कार्यरत होते. त्यांनाही विचारा, ज्या ज्या मिटिंग झाल्या त्याचे सगळे कागदपत्र, त्याच्या मंजुऱ्या सगळं मंत्रालयात दिलेलं आहे. ते आता तुमच्याचकडे आहेत. त्यात तुम्ही काही फेरफार केलेले असतील तर मला माहिती नाही. पण खूप स्पष्ट कारभार तिथे झालेला आहे. एक जरी माझं स्वत:चं वाऊचर आढळलं तर माझ्यावर कारवाई करा. राम कृष्ण हरी. मी काहीही केलेलं नाहीये. गणपती बाप्पा मोरया.”

“सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी शेवटच्या क्षणापर्यंत नाही तर आतासुद्धा गणपतीच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो इतकं स्पष्ट आणि स्वच्छ काम तिथे केलेलं आहे. उगाच कोणीतरी खोटे आरोप करू नयेत ही माझी विनंती आहे”, असंही आदेश बांदेकर म्हणाले.

मराठी बातम्या/मनोरंजन/

मी दोषी आढळलो तर सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या..! एकनाथ शिंदेंच्यावर आरोपांवर बांदेकर भडकले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *