जेलीफिशचा दंश अन् हातावर 11 शस्त्रक्रिया, पण तिनं हार नाही मानली, आता पुणेकर गीताचा जगात डंका! Video | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

Pune news: इंग्लिश चॅनेल पार केल्यानंतर आता गीताचे पुढील ध्येय ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळवण्याचे आहे. त्यासाठी तिला जगातील सात प्रमुख समुद्री खाड्या पार करायच्या आहेत.

+

जेलीफिशचा

जेलीफिशचा दंश अन् हातावर 11 शस्त्रक्रिया, पण तिनं हार नाही मानली, आता पुणेकर गीताचा जगात डंका! Video

पुणे : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण पुण्याच्या मुळशी तालुक्यातील जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने घालून दिले आहे. जेलीफिशच्या विषारी दंशामुळे एका हातावर तब्बल 11 शस्त्रक्रिया झाल्यानंतरही हार न मानता गीताने इंग्लिश चॅनेल यशस्वीरीत्या पार करत इतिहास रचला आहे. 27 जून रोजी तिने इंग्लिश चॅनेलचे आव्हान पूर्ण केले. समुद्रातील प्रचंड लाटा आणि प्रवाहामुळे 35 किलोमीटरचे अंतर प्रत्यक्षात 54 किलोमीटरपर्यंत वाढले आणि गीता हे अंतर 14 तास 31 मिनिटांत पोहत पूर्ण करण्यात यशस्वी ठरली.

इंग्लिश चॅनेल स्विमिंग असोसिएशनच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली. गीता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि प्रतीक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कठोर सराव करत आहे. तिच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून आणि विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

मुळशीतील गीता ही लहानपणापासूनच जलतरणाशी जोडली गेली. अवघ्या तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला पोहण्याचे प्रशिक्षण सुरू करून दिले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने पहिल्याच स्पर्धेत पदक जिंकले आणि त्यानंतर जलतरणाची आवडच तिच्या ध्येयात बदलली. वयाच्या आठव्या वर्षीच इंग्लिश चॅनेल पार करण्याचे स्वप्न तिने मनाशी पक्के केले होते.

मात्र, तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे तिच्या सरावात दोन वर्षांचा खंड पडला. त्यानंतर 2022 मध्ये रत्नागिरी येथे खुल्या समुद्रातील स्पर्धेदरम्यान जेलीफिशच्या विषारी दंशामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती इतकी गंभीर होती की हात गमावण्याची वेळ आली होती. एका वर्षात तिच्यावर तब्बल 11 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे तिचे जलतरण कारकीर्द संपल्याची भीती व्यक्त केली जात होती.

शस्त्रक्रियेनंतर जवळपास वर्षभर सराव बंद होता. मात्र, गीताने हार मानली नाही. सुरुवातीला केवळ 30 मिनिटांपासून पुन्हा सराव सुरू केला. जखमांमधून रक्त येत असतानाही ती नियमित सराव करत राहिली. उजव्या हातावरील दुखापतीमुळे तिने डाव्या हातावर अधिक भर दिला, त्यामुळे खांद्यालाही दुखापत झाली. तरीही तिचे लक्ष फक्त इंग्लिश चॅनेलच्या ध्येयावर केंद्रित होते.

या मोहिमेसाठी तिने दररोज पाच ते आठ तास, तर आठवड्याच्या शेवटी दहा ते बारा तास कठोर सराव केले. थंड पाण्याची सवय व्हावी म्हणून रात्रीच्या वेळी सराव करण्यात आला. इंग्लंडला जाण्यापूर्वीही जेलीफिशचा पुन्हा दंश झाला होता. डॉक्टरांनी आवश्यक औषधोपचार आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. तरीही कोणत्याही भीतीला न जुमानता गीताने स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला.

गीताचे प्रशिक्षक प्रतीक जावडेकर यांनी सांगितले की, इंग्लिश चॅनेल हे जगातील सर्वात कठीण जलतरण आव्हानांपैकी एक आहे. थंड पाणी, अनिश्चित हवामान, भरती-ओहोटी आणि समुद्रातील प्रवाह यामुळे या स्पर्धेसाठी वेगळ्या प्रकारचा सराव आवश्यक असतो. यासाठी हिमालयीन भागातील थंड पाण्यात तसेच रात्रीच्या वेळी खुल्या पाण्यात विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

इंग्लिश चॅनेल पार केल्यानंतर आता गीताचे पुढील ध्येय ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळवण्याचे आहे. त्यासाठी तिला जगातील सात प्रमुख समुद्री खाड्या पार करायच्या आहेत. याच मोहिमेअंतर्गत सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल आणि ऑक्टोबरमध्ये न्यूयॉर्कमधील ‘ट्वेंटी ब्रिजेस’ जलतरण स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. तिची ही प्रेरणादायी यशोगाथा आजच्या युवा पिढीसाठी जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाचा आदर्श ठरत आहे.

मराठी बातम्या/पुणे/

जेलीफिशचा दंश अन् हातावर 11 शस्त्रक्रिया, पण तिनं हार नाही मानली, आता पुणेकर गीताचा जगात डंका! Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *