RCB vs GT IPL Final 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (RCB vs GT IPL Final 2026)
The eyes say it all 👀
The hunger, the focus, and the desire to lift that trophy 🏆#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT | @RCBTweets | @gujarat_titans pic.twitter.com/5S6EAqSbcH
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
बंगळुरु आणि गुजरात या दोन्ही संघांनी एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 31 मे रोजी, यापैकी एक संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स, हे दोन्ही बलाढ्य संघ आता ट्रॉफी जिंकण्यासाठी आमनेसामने येतील. आरसीबीने क्वालिफायर 1 जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले, तर गुजरातने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
पाऊस पडल्यास काय होईल? (RCB vs GT IPL Final 2026)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आल्यास, 31 मे रोजी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सतत पाऊस पडल्यास, षटकांची संख्या कमी केली जाईल. पाऊस सुरूच राहिल्यास, अतिरिक्त 120 मिनिटे जोडली जातील. सामन्याचा निकाल लागावा, यासाठी प्रत्येक डावात किमान पाच षटके खेळवली जातील याची खात्री करण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीही सामना सुरू होऊ शकला नाही, तर तो 31 मे रोजी खेळला जाणार नाही. अशा परिस्थितीत, सामना राखीव दिवशी, म्हणजेच 1 जून रोजी खेळवला जाईल.
खेळपट्टी कोणाला अनुकूल ठरेल? (RCB vs GT IPL Final 2026)
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्सचे घरचे मैदान आहे. घरच्या मैदानावरील परिस्थितीनुसार, गुजरात संघाला साहजिकच फायदा होईल. आयपीएल 2026 मध्ये, गुजरातने या मैदानावर सात सामने खेळले आणि पाच जिंकले. दुसरीकडे, आरसीबीची या मैदानावर कामगिरी संमिश्र राहिली आहे. बंगळुरुने आठपैकी चार सामने जिंकले आहेत आणि चार वेळा पराभव पत्करला आहे.
दोन्ही संघांची गोलंदाजी आक्रमक- (RCB vs GT IPL Final 2026)
शुभमन गिल आणि सुदर्शनचा अपवाद वगळता गुजरातचे इतर फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात नाहीत. दोन्ही संघांचे गोलंदाजी आक्रमण मात्र जवळपास बरोबरीचे आहे. गुजरातच्या फलंदाजीची हीच कमकुवत कडी ओळखून आरसीबी रणनीती आखत आहे. जर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या गोलंदाजी आक्रमणाने शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना पॉवरप्लेमध्येच स्वस्तात बाद केले, तर बंगळुरूचा अर्धा रस्ता तिथेच सोपा होईल. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी या हंगामात मिळून तब्बल 1,432 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे महाअंतिम सामन्यात या जोडीची विकेट मिळवणे हेच बंगळुरूच्या विजेतेपदाचे खरे सूत्र ठरणार आहे.
जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार? (RCB vs GT IPL Final 2026)
आयपीएल 2026 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु किंवा गुजरात टायटन्स या संघालाही कोट्यवधी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. याव्यतिरिक्त, प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या इतर दोन संघांनाही बक्षीस रक्कम मिळेल. राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला, त्यामुळे त्यांना 7 कोटी रुपये मिळतील, तर सनरायझर्स हैदराबादला 6.5 कोटी रुपये मिळतील.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा