Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई : महायुती मधील घटकपक्षांना महाराष्ट्रात सत्ता मिळवून देण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरलेली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्षांना फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती,  काही महिलांनी ई केवायसीचे पर्याय निवडताना चूक केल्यानं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर किती महिला अपात्र ठरल्या यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद झाला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. 

80 लाख महिला अपात्र ठरल्या

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. मात्र, 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यानंतर ती संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या अटी निश्चित करताना संबंधित महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे ही अट निश्चित करण्यात आली होती. याशिवाय इतर अटी देखील होत्या. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिल पर्यंत संधी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर या योजनेतील लाडक्या बहिणींची आकडेवारी समोर आली आहे. साधारणपणे 1 कोटी 66 लाख महिला पात्र ठरल्या  आहेत. तर, 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचं देखील समोर आलं आहे. 

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 13 आणि 14 मे पासून देण्यास सुरुवात झाली होती. आज मे महिन्याचा अखेरचा दिवस असून लाडक्या बहिणींचं लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लागलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानं यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जातात.
  

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *