Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालीय का हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मंगळवारी कोथरुडमध्ये ज्या अमित शिंदे याच्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) करण्यात आला, तो निलेश घायवळच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) अमित शिंदे यांच्या कोथरुडमधील मोबाईल दुकानातून सीमकार्ड घेतले होते. पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अमित शिंदेवर (Amit Shinde) काल कोयत्याने हल्ला करण्यात आला. हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलीसांच म्हणणं आहे. मात्र, या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे. निलेश घायवळ हा सप्टेंबर महिन्यात परदेशात पळून गेला असून परदेशातुन तो टोळी चालवत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Pune Crime news)
निलेश घायवळ याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली, त्यावेळी जे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आहे. या प्रकरणात अमित शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. अमित शिंदे यांचं कोथरुडमध्ये दुकान आहे. अमित शिंदे यांच्या मोबाईल शॉपमधून बनावट कागदपत्रांच्याआधारे निलेश घायवळने एक सीमकार्ड घेतले होते. या सीमकार्डचा उपयोग तो बऱ्याच गुन्ह्यांसाठी करत होता. तपासात ही गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी अमित शिंदे यांच्या फिर्यादीवरुन निलेश घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश घायवळवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्याच्या प्रक्रियेत हा गुन्हा महत्त्वाचा ठरला होता. याच अमित शिंदे यांच्यावर एका टोळीकडून कोयत्याने हल्ला केला जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला आहे. अमित शिंदे यांच्या नातेवाईकांकडूनच हा हल्ला घडवून आणण्यात आला, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या सगळ्या हल्ल्यापाठी अमित शिंदे यांनी निलेश घायवळविरोधात दाखल केलेला गुन्हा असल्याची शक्यता आहे. अमित शिंदे यांच्यावर नातेवाईकांनी हल्ला केल्याचे सांगितले जात असले तरी हा वाद टोळीने हल्ला करण्याइतपत मोठा होण्याची शक्यता नाही, अशी चर्चा आहे. निलेश घायवळ सप्टेंबर महिन्यात भारतातून पळून गेला होता. त्याच्या प्रत्यापर्णासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे त्याची टोळी पुण्यात असे हल्ले करत असल्यामुळे निलेश घायवळ गँग अजूनही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
Kothrud Crime news: कोथरुडमध्ये 8 ते 10 जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील कोथरूड परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिंदे हा कोथरूडमधील त्याच्या मोबाईल दुकानात काम करत होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो दुकानाबाहेर उभा असताना अचानक आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी अमितवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात अमितच्या डोक्यावर कोयत्याचे दोन गंभीर वार बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय, हा पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे की इतर कोणते कारण आहे, याचा तपास केला जात आहे.
आणखी वाचा