Sanjay Raut: आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक मांडले जाणार असून त्या विधेयकाला ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून पाठिंबा दिला जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या अनुषंगाने शरद पवार गट भाजपसोबत हातमिळवणी करुन महायुतीसोबत (Mahayuti) सत्तेत बसू शकतो, असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सगळ्या आरोपांमध्येही काहीही तथ्य नसल्याचे म्हटले. शिंदे गट आणि भाजपकडून महाविकास आघाडीतील (MVA Alliance) पक्षांच्या आमदारांविषयी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics news)
काल जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटले. त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही तिकडे होते. ही माहिती अर्धवट असून काही अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या माहितीनुसार, फुटबॉल वर्ल्डकप सुरु आहे, प्रफुल पटेल तिकडे आहेत , फुटबॉल वर्ल्डकप असताना ते नेहमी परदेशात जातात. त्यामुळे कालच्या बैठकीला ते नसावेत. जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना वेगळ्या कारणासाठी भेटले. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघातील एका नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीारपणे अपात्र ठरवले. इस्लामपूरचा हा नगराध्यक्ष लोकांतून निवडून आलेला होता.
या विषयासंबंधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार केली. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे आणि मविआचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार, यामध्ये तथ्य नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांविषयी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या या बातम्या ऐकून सुप्रिया सुळे यांनाही आश्चर्य वाटत आहे. मी त्यांच्याशी आजच सविस्तर बोललो. त्या आज यासंबंधी बोलणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक पावसाळी अधिवेशनात आल्यावर त्यावरील भूमिका आम्ही ठरवू. पण विविध राजकीय पक्षाचे खासदार फोडून केंद्र सरकार बहुमत जमवेल, या आरोपात काही तथ्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Delimitation bill: पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला ठाकरे आणि शरद पवार गट पाठिंबा देण्याची चर्चा
मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात लोकसभेच्या 50 टक्के जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शाह यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, काँग्रेस आणि डीएमके यांनी देखील होकार दिल्याचे सुप्रिया सुळेंकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सुप्रिया सुळे बुधवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर बोलणार आहेत.
आणखी वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया