Last Updated:
या किरकोळ कामांच्या मोबदल्यात तरुणांना ऑनलाईन पैसे पाठवून आधी त्यांचा पूर्ण विश्वास जिंकला जात होता. मात्र, एकदा का तरुण पैशांच्या आमिषाला बळी पडला आणि त्याचा विश्वास संपादन झाला, की…
पुणे : सोशल मीडियावर रिल्स बनवताना किंवा फोटो पोस्ट करताना हातात कोयता, तलवार किंवा गावठी कट्टा घेऊन ‘भाईगिरी’ची पोझ देणाऱ्या पुण्याच्या तरुणांसाठी एक अतिशय धक्कादायक आणि डोळे उघडवणारी माहिती समोर आली आहे. अशा प्रकारची शस्त्रांसोबतची पोझ देणारे तरुण सोशल मीडियावर दिसले, की थेट पाकिस्तानातून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. पाकिस्तानस्थित कुप्रसिद्ध गुंड शहजाद भट्टी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अशा अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्यांना देशविघातक कारवायांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवल्याचा खळबळजनक खुलासा तपास यंत्रणांच्या चौकशीत झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सोशल मीडियावरून सहज मिळणाऱ्या छोट्या ‘ऑनलाईन टास्क’च्या बदल्यात घरात बसून पैसे कमावण्याचे आमिष या तरुणांना दाखवले जात होते. अगदी साधी कामे जसे की, एखाद्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पोस्टवर लाईक/कमेंट करणे. सुरुवातीला केवळ साधे फोटो किंवा रिल्स शेअर करणे. एखाद्या ठराविक परिसराची किंवा ठिकाणाची वरवरची माहिती देणे. या किरकोळ कामांच्या मोबदल्यात तरुणांना ऑनलाईन पैसे पाठवून आधी त्यांचा पूर्ण विश्वास जिंकला जात होता. मात्र, एकदा का तरुण पैशांच्या आमिषाला बळी पडला आणि त्याचा विश्वास संपादन झाला, की त्याला अतिशय गंभीर आणि देशविघातक कामांकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात होता.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात बसलेला गुंड शहजाद भट्टी हा सोशल मीडियावरील अशा तरुणांवर विशेष लक्ष ठेवून होता जे हातात गावठी कट्टा, कोयता, तलवार किंवा इतर शस्त्रे घेऊन फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट करायचे. अशा तरुणांची मानसिकता गुन्हेगारीकडे झुकलेली आहे हे ओळखून तो त्यांच्याशी थेट संपर्क साधायचा. त्यानंतर, त्यांना पैशांचे मोठे प्रलोभन दाखवून “एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणाचे गुप्त फोटो काढून पाठवणे”, “परिसराची रेकी करून माहिती देणे” अशी संशयास्पद कामे दिली जात होती. पंजाबमध्ये अशा प्रकारे काही गंभीर गुन्हेही घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान नुकतंच पुण्यातही ATS ने 66 ठिकाणी छापे टाकत ५० जणांना ताब्यात घेतलं आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टीचा भारतात बनावट नोटांचे रॅकेट चालविणे, अंमली पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणे, तसेच सीमेपलीकडून घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कशी थेट संबंध असल्याचा संशय आहे. याच नेटवर्कसाठी तो सोशल मीडियावरून सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढत होता.
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींनी दिलेली ऑनलाईन कामे, त्या बदल्यात मिळणारे अकाऊंटमधील पैसे किंवा येणारे संशयास्पद संदेश याबाबींकडे तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी अत्यंत सतर्कतेने पाहण्याची गरज आहे. केवळ काही पैशांच्या आमिषापोटी किंवा सोशल मीडियावरील दिखाव्यापोटी आपले आयुष्य गुन्हेगारी आणि देशद्रोहाच्या दलदलीत ढकलले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
Pune,Maharashtra
Jul 15, 2026 11:39 AM IST
ती पोझ दिलेला तरुण सोशल मीडियावर दिसला की ‘टार्गेट’; थेट पाकिस्तानमधून घडायचं कांड, पुण्यातील अनेकजण जाळ्यात?
