Last Updated:
Beed News: पती दारू पिऊन मारहाण करायचा, तर सासू चंद्रकला, सासरे, दीर आणि जाऊ मिळून जेवण न देता उपाशीपोटी ठेवयाचे.
बीड: कौटुंबिक छळातून कोल्हापूरच्या अस्मिता काटकर हिने मृत्यूला कवटाळलं. हे प्रकरण ताजं असतानाच आता बीडच्या केज तालुक्यातून एक संतापजनक प्रकार पुढे आला आहे. प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या लोकांनी भयंकर छळ केला. तसेच माहरून पैसे आणण्यासाठी दोन चिमुकल्यांसह घराबाहेर हाकललं. पीडित विवाहितेने थेट पोलिसांत धाव घेतली असून पती, सासू-सासरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संध्या ऋषीकेश खाडे (वय 28) हिचा 2017 मध्ये ऋषीकेश दत्तू खाडे याच्यासोबत प्रेमविवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये देखील आहेत. लग्नानंतर सुरुवातीला काही काळ सगळं सुरुळीत सुरू होतं. जवळपास सात वर्षे सासरच्यांनी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, त्यानंतर परस्थिती बदलली आणि छळ सुरू झाल्याचं फिर्यादित म्हटलं आहे.
पती ऋषीकेश याला 2023 पासून दारूचं व्यसन लागलं. तो दररोज दारू पिऊनच घरात येऊ लागला. तसेच किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. त्यानंतर पत्नी संध्याला मारहाण सुरू झाली. घर घेण्यासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. संध्याच्या माहेरची परस्थिती गरिबीची आहे. मात्र, पैशासाठी सासरच्यांचा छळ वाढतच गेला.
पती दारू पिऊन मारहाण करायचा, तर सासू चंद्रकला, सासरे, दीर आणि जाऊ मिळून जेवण न देता उपाशीपोटी ठेवयाचे. तसेच मारहाण करायचे. ‘लव्ह मॅरेज केलं आहे, तर आता भोग’ म्हणून ते मानसिक आणि शारीरिक छळ करत होते, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
“4 लाख रुपये घेऊन आलीस तरच घरात पाय ठेव, नाहीतर तुला कुठे जायचे तिकडे जा’, असे म्हणत संध्या हिला दोन चिमुकल्यांसह पतीने घराबाहेर काढले. गेल्या वर्षभरापासून संध्या मुलांसह माहेरी राहते. नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतरही सासरची मंडळींनी घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे संध्या हिने केज पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पती ऋषीकेश खाडे, सासू चंद्रकला, सासरा दत्तू खाडे, दीर दीपक खाडे आणि जाऊ सोनाली खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Bid (Beed),Bid,Maharashtra
Jul 15, 2026 10:35 AM IST
Beed: ‘लव्ह मॅरेज केलं आता भोग’, कोल्हापूरच्या अस्मिता सारखं बीडच्या संध्याला छळलं, दोन चिमुकल्यांसह घराबाहेर काढलं अन्…
