Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त


Pawanraje Nimbalkar Case  मुंबई: राज्यातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भात एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल वीस वर्षानंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आज (16 जून) लागण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court)  आज सकाळी 11 वाजता या हत्येप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे संपूर्ण कुटुंबासह सुनावणीसाठी उपस्थीत राहणार असल्याची माहिती आहे. सोबत समद काझी यांचं कुटुंबही सुनावणीवेळी हजर राहणार आहे. निंबाळकर आणि काझी कुटुंब सध्या मुंबईत दाखल झालं आहे. पवनराजे निंबाळकर यांचे चालक समद काझी यांचाही गोळीबारात मृत्यू झाला होता. तब्बल 20 वर्षानंतर खून खटल्याचा आज निकाल लागण्याची शक्यता असून या निकालाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. (Pawanraje Nimbalkar Case Verdict Today After 20 Years)

 Dharashiv News : निकालाच्या अनुषंगाने धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त

दुसरीकडे, पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या निकालाच्या अनुषंगाने धाराशिव पोलीस सतर्क असून पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडून सर्व पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हि खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील घडामोडींवरही पोलिसांचं लक्ष असणार आहे. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात डॉक्टर पद्मसिंह पाटील आरोपी असल्याने धाराशिवमध्ये राजकीय दृष्ट्या ही प्रकरण अधिक संवेदनशील आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडील कार्यकर्त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case) 

दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *