OTT Release This Week: मनोरंजन विश्वात सध्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. विविध धाटणीच्या कथा आणि प्रयोगशील विषयांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जबरदस्त खजिना खुला होणार आहे. कोर्टरूम ड्रामा, हॉरर मिस्टरी, स्पाय थ्रिलर, कौटुंबिक कॉमेडी आणि ग्लॅमरस रियालिटी शो अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि मालिका घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे वीकेंड एन्जॉय करण्यासाठी हा आठवडा खास ठरणार आहे.
सिस्टीम – ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ
22 मे रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणारा ‘सिस्टीम’ हा कोर्टरूम ड्रामा सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ज्योती का आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीच्या दोन महिलांची ही कथा आहे. यातील एक महत्त्वाकांक्षी सरकारी वकील असून दुसरी साधी कोर्टरूम स्टेनोग्राफर आहे. कायदेशीर व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि त्रुटींविरोधात या दोघी एकत्र लढा देताना दिसणार आहेत. ट्रेलरमधील कोर्टरूम सीन्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
द ममी – प्राईम व्हिडिओ, ॲपल टीव्ही, गुगल प्ले
19 मे रोजी प्रदर्शित झालेला ‘द ममी’ हा हॉरर चित्रपट थरारप्रेमींसाठी खास ठरणार आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असून ॲपल टीव्ही आणि गुगल प्लेवर रेंटवरही पाहता येणार आहे. दिग्दर्शक ली क्रोनिन यांच्या या चित्रपटाची कथा एका पत्रकाराभोवती फिरते. त्याची मुलगी इजिप्तच्या वाळवंटात बेपत्ता झालेली असते. मात्र आठ वर्षांनी ती अचानक रहस्यमय पद्धतीने घरी परतते. सुरुवातीला हा चमत्कार वाटत असला तरी हळूहळू त्या कुटुंबासमोर एक भयानक गूढ उलगडत जातं.
देसी ब्लिंग- नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ हा रियालिटी शो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या श्रीमंत एनआरआयंच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या शोमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय जोडी झळकणार आहे. दुबईतील आलिशान जीवनशैली, ग्लॅमरस पार्ट्या, वैयक्तिक स्पर्धा आणि ड्रामाने भरलेलं हे जग प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देणार आहे.
मधुविधू- सोनी लिव्ह
‘मधुविधू’ ही कौटुंबिक विनोदी मालिका 22 मेपासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे. तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड या चार भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध होणार आहे. एका तरुणाभोवती फिरणारी ही कथा आहे. विचित्र आणि गोंधळलेल्या कौटुंबिक वातावरणात तो वधूच्या शोधात निघालेला असतो. थिएटरमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता तो ओटीटीवरही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
सतरंगी : बदले का खेल’ – झी 5
22 मे रोजी झी 5 वर ‘सतरंगी : बदले का खेल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील सुडाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. बबलू महतोच्या मुलाची ही गोष्ट असून तो दुहेरी आयुष्य जगत असतो. वर्षानुवर्षे त्याच्या वडिलांचा अपमान करणाऱ्या शक्तिशाली कुटुंबांविरोधात तो सूड उगवण्याचा कट रचतो. जातीय राजकारण, सामाजिक संघर्ष आणि टिकून राहण्यासाठीचा लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
लेडीज फर्स्ट- नेटफ्लिक्स
22 मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘लेडीज फर्स्ट’ ही विनोदी वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत साचा बॅरन कोहेन आणि रोजा मंडपाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्त्रियांच्या हातात सामाजिक आणि राजकीय सत्ता असलेल्या जगाची ही भन्नाट कल्पना आहे. अशा परिस्थितीत पुरुष स्वतःचं स्थान शोधण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. विनोदासोबतच समाजावर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे.
आणखी वाचा