OTT Webseries: जर तुम्ही OTT वर सारख्या क्राइम थ्रिलर आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट-सीरिज पाहून कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं पाहण्याच्या शोधात असाल, तर ही नवी सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी यावेळी OTT वर अशी एक उत्तम सीरिज आली आहे, ज्यामध्ये भारतातील पहिल्या यशस्वी स्टार्टअप्सपैकी एका कंपनीचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. या सीरिजची कथा इतकी रंजक आहे की प्रदर्शित होताच तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. शिवाय कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळेही या सीरिजची चर्चा रंगली आहे. IMDb वर या सीरिजला 10 पैकी तब्बल 8.8 रेटिंग मिळालं आहे.
काय आहे सीरिजची कथा?
मनगटावर घड्याळ खरेदी करण्याचा विचार आला की सर्वप्रथम अनेकांच्या डोळ्यासमोर टायटन हे नाव येतं. पण टायटनची सुरुवात कशी झाली? हा ब्रँड भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह ब्रँडपैकी एक कसा बनला? याच प्रवासाची कथा ‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ (Made In India: Titan Story) या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. या सीरिजमध्ये दूरदर्शी उद्योजक झेरक्सेस देसाई यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यांना जे.आर.डी. टाटा यांचा पाठिंबा मिळाला होता. 1980 च्या दशकात त्यांनी शून्यातून भारताचा पहिला जागतिक दर्जाचा स्वदेशी घड्याळ ब्रँड उभारला आणि तस्करांच्या प्रभावाखाली असलेल्या घड्याळ बाजाराला थेट आव्हान दिलं.
एका अपमानातून जन्माला आली मोठी कल्पना
1970 च्या दशकात भारतीय घड्याळ बाजारावर स्वस्त आयात केलेल्या घड्याळांचं आणि तस्करीतून येणाऱ्या उत्पादनांचं वर्चस्व होतं. दुसरीकडे विदेशी ब्रँड्स सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर होते. याच काळात जे.आर.डी. टाटा यांना एका स्विस घड्याळ उत्पादकाशी बोलताना अपमानास्पद अनुभव आला. भारतीय कंपनी जागतिक दर्जाची घड्याळे बनवू शकते, ही कल्पनाच त्या व्यक्तीने फेटाळून लावली होती. या घटनेने प्रेरित होऊन जे.आर.डी. टाटा यांनी टाटा समूहातील महत्त्वाकांक्षी अधिकारी झेरक्सेस देसाई यांच्यावर जगातील सर्वोत्तम ब्रँड्सशी स्पर्धा करू शकतील अशी स्वदेशी घड्याळे तयार करण्याची जबाबदारी सोपवली.
कलाकारांचा दमदार अभिनय
या सीरिजमध्ये जे.आर.डी. टाटा यांच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. तर झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत जिम सर्भ यांनीही प्रभावी छाप सोडली आहे. ‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ ही सीरिज 3 जूनपासून MX Player वर स्ट्रीम होत असून सध्या प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष