सांगली: सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजप सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झाले आहेत.
भाजपकडून सांगली – सातारा विधानपरिषद निवडणुकीत धोका टाळण्यासाठी भाजपकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सतर्कता बाळगण्यात आली असून खासगी एसी ट्रॅव्हल्स मधून नगरसेवक आणि नगरसेविकांना अज्ञात ठिकाणी पाठवण्यात आले आहे. नगरसेवकांसोबत कुटुंबीयातील पती, पत्नी, मुलांसह सदस्यही सहलीवर गेले असल्याची माहिती आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत सामना
महायुतीमध्ये सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघ भाजपकडे आहे. या मतदारसंघात भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सहज विजय होईल इतकं संख्याबळ आहे. मात्र, या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असल्यानं धक्कादायक निकाल लागू शकतो. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका देखील निर्णायक ठरेल.
सातारा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याचे सर्वाधिकार मंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आले आहेत. आता मकरंद पाटील वरिष्ठांसोबत बोलून यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी स्थिती असल्याचं वक्तव्य केलं होतं.
12 मतदान केंद्रावंर मतदान
सांगली सातारा विधानपरिषदेसाठी निवडणुकीसाठी एकूण 12 मतदान केंद्रे असून त्यापैकी 7 मतदान केंद्रे सातारा जिल्ह्यात आणि 5 मतदान केंद्रे सांगली जिल्ह्यात आहेत. एकूण मतदारसंख्या 895 असून त्यापैकी 472 मतदार सातारा जिल्ह्यातील आणि 423 मतदार सांगली जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 12 तालुके असून 1 जिल्हा परिषद, 9 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके असून 1 जिल्हा परिषद, 1 महानगरपालिका, 5 नगरपरिषदा आणि 6 नगरपंचायती आहेत.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप