NCP on Poor Food Served on Film and TV Sets: गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन आयु्क्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. FDAकडून आतापर्यंत अनेक कंपन्यांच्या (Entertainment) भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवत, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत माहिती दिली. तसेच स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय तपासणी करून आवश्यक ती कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.
मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा आरोप (Poor Food Served on Film and TV Sets NCP Leader demands action)
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी तसेच हिंदी मालिकांचे, चित्रपटांचे आणि वेब सिरीजचे शूटिंग सुरू असते. चित्रिकरणादरम्यान कलाकारांना आणि तंत्रज्ञांना अन्न पुरवण्यात येते. पण ते अन्न निकृष्ट दर्जाचे असून, अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात येतात. दरम्यान, हाच प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवत यावर कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर अनेक शहरांमध्ये मराठी, हिंदी आणि विविध भाषांतील मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण सुरू असते. या चित्रीकरणामध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, अनेक चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत, असं बाबासाहेब पाटील यांनी पत्रात म्हटलं.
तसेच, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे, अस्वच्छ, आरोग्यास अपायकारक तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे अन्न पुरविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी कलाकार व तंत्रज्ञ सलग 12 ते 16 तास अथवा त्याहून अधिक काळ काम करतात. त्यामुळे त्यांना दर्जेदार, स्वच्छ, पौष्टिक व सुरक्षित अन्न मिळणे ही संबंधित निर्मिती संस्था, केटरिंग सेवा पुरवठादार व संबंधित उत्पादन संस्थांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी आहे. परंतु अनेक ठिकाणी या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आपण नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी जबाबदारी स्वीकारली असून, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली.
बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे कोणत्या मागण्या केल्या,
1.राज्यभरातील सर्व चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत अचानक (Surprise) तपासणी मोहीम राबविण्यात यावी.
2. कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने तपासून अन्नसुरक्षा व मानके अधिनियम (FSSAI) अंतर्गत त्यांची गुणवत्ता तपासण्यात यावी.
3. निकृष्ट, अस्वच्छ अथवा आरोग्यास अपायकारक अन्न पुरविणाऱ्या केटरिंग कंत्राटदार, निर्मिती संस्था व संबंधितांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. सर्व चित्रीकरण स्थळांसाठी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवण, पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृहाची स्वच्छता व अन्न वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी करण्यात यावीत.
5. अन्नसुरक्षा नियमांचे नियमित पालन होत आहे की नाही यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी व निरीक्षण मोहीम राबविण्यात यावी.
कलाकार व तंत्रज्ञांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या: