सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. शिवसनेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठा धक्का बसताना दिसत आहे. पहिले सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची चर्चा सुरु आहे. तेथील 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांनतर आज नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
ठाकरे गटातील काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनंतर नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाने गटनेता कार्यालयात बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना गटनेता केशव पोरजे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
5 कोटींची ऑफर
केशव पोरजे म्हणाले की, कोणतेही नगरसेवक फुटणारा नाहीत. काल आम्ही आयुक्तांना निवेदन दिले तेव्हा 13 नगरसेवक उपस्थित होते. ही केवळ अफवा आहे आम्ही एकमेकांना संशयातून बघू असा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यात कोणी मोठ्या पदासाठी इच्छुक असेल ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात उपमहापौर बनायचे आहे ते आमच्याकडे एजंट पाठवत आहेत. त्यांचा एक एजंट आहे तो आमच्याकडे पाठवतात. पाच कोटी रुपयांची ऑफर देता. पाच ते सहा नगरसेवकांना ते भेटले आहेत. विकास कामांसाठी पाच कोटींची ऑफर दिली जात आहे.
“जे नगरसेवक जातील त्यांना जनता तुडवेल”
पुढे ते म्हणाले की, कालच आम्ही मनपा आयुक्तांना भेटलो आम्हाला निधी मिळत नाही आमच्याकडे अधिकारी लक्ष देत नाही. नगरसेवक यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, निधी द्याचा नाही, ते कंटाळून पक्षप्रवेश करतील. पाच कोटी सह आर्थिक देवाणघेवाण राम मंदिरावरील लक्ष घालवण्यासाठी अशी अफवा सुरु आहे. जे दोन चार नगरसेवक घेऊन जातील ते अपात्र ठरतील. खासदार फुटल्यानंतर तुडवा म्हणून सांगितलं. जे नगरसेवक जातील त्यांना जनता तुडवेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाकडे असलेल्या १० ते १२ नगरसेवकांमध्ये शिंदे गटाकडे जाण्याची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेला 15 पैकी 5 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.