MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला


Rohit Pawar on Devendra Fadnavis :  एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्यावरुन वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरुन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार असून, या प्रकरणी एसआयटी तपास करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलीय. असंख्य प्रकरणामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही असा टोला रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी

आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत असा टोला देखील रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल. एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्‍यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *