Moshi Accident: त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं ९ जणांना गिळलं, 83 तासांत काय घडलं? मोशी दुर्घटनेचा थरकाप उडवणारा घटनाक्रम | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळलेल्या या काळानं ९ निष्पाप कर्मचाऱ्यांचे प्राण गिळले. तब्बल ८३ तास मृत्यूशी झुंज देत, रात्रंदिवस राबवलेली ही थरारक शोधमोहीम अखेर पूर्ण झाली.

मोशी दुर्घटना घटनाक्रम
मोशी दुर्घटना घटनाक्रम

पिंपरी : पिंपरी-चिंचवडजवळील मोशी येथे घडलेल्या कचऱ्याचा डोंगर कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळलेल्या या काळानं ९ निष्पाप कर्मचाऱ्यांचे प्राण गिळले. तब्बल ८३ तास मृत्यूशी झुंज देत, रात्रंदिवस राबवलेली ही थरारक शोधमोहीम अखेर पूर्ण झाली. भारतीय सेना, एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर हा थरार थांबला असला, तरी मागे अनेक उघड्या पडलेल्या संसारांचे अश्रू ठेवून गेला आहे. ८ जुलैच्या त्या काळ्या दुपारपासून ते १२ जुलैच्या पहाटेपर्यंत… या ८३ तासांत तिथे नेमकं काय घडलं? याचा हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम.

८ जुलै : ती ‘काळी दुपार’

दुपारी दीड वाजता मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर अचानक कचऱ्याचा एक महाकाय ढिगारा कोसळला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि इमारतीसह परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. दुर्घटनेच्या वेळी एकूण २३ जण यात अडकले होते. ज्यातील २२ जण इमारतीच्या आत होते, तर १ जण बाहेर कचऱ्याखाली गाडला गेला. सुदैवाने ५ जणांनी प्रसंगावधान राखत स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ युद्धपातळीवर संयुक्त बचावमोहीम सुरू केली.

पहिल्याच रात्री शोधपथकाला मोठे यश आले. ढिगाऱ्याखालून सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह एकूण ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

९ जुलै : श्वास रोखणारा दिवस

संपूर्ण ९ जुलै रोजी अडकलेल्या इतर ९ कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावली. ढिगाऱ्याखाली जीव अडकलाय का, हे पाहण्यासाठी श्वान पथक, लाईव्ह डिटेक्टर आणि साउंड डिटेक्टर यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. दुर्दैवाने, सर्व प्रयत्नांनंतरही यश आले नाही आणि अडकलेल्या व्यक्तींशी कोणताही संपर्क होत नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले, ज्यामुळे नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला.

१० जुलै : पहिला मृतदेह सापडला

दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखालून भावेश वाणी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा पहिला मृतदेह हाती लागल्याने इतर नातेवाईकांच्या आशा आता अधिक धूसर होऊ लागल्या होत्या.

११ जुलै : काँक्रीट तोडलं…अन् एकामागून एक ७ मृतदेह बाहेर

अडकलेले लोक इमारतीचा काँक्रीटचा भाग कोसळल्यामुळे आत अडकले होते. त्यामुळे ११ जुलै रोजी रेस्क्यू टीमने इमारतीचा तो जड काँक्रीटचा भाग तोडून आत जाण्याचा मार्ग तयार केला. ११ जुलैच्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत इमारतीच्या आतून एकामागून एक तब्बल ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यात अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड यांचा समावेश होता.

१२ जुलै : ८३ तासांनंतर शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त

पहाटे १ वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले शेवटचे बेपत्ता व्यक्ती वामन कसबे यांचा मृतदेह अखेर रविवारी पहाटे १ वाजता सापडला.

सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर १२ जुलैच्या पहाटे ८३ तास अखंड चाललेली ही शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त करण्यात आली. एकूण ९० जवानांच्या तुकड्या, डॉग स्क्वॉड आणि पोकलेन-डंपरच्या मदतीने ही मोहीम फत्ते झाली. या ८३ तासांच्या थरारानंतर मोशी कचरा डेपो परिसर तूर्तास शांत झाला असला, तरी प्रशासकीय हलगर्जीपणामुळे ९ निष्पाप लोकांचे गेलेले बळी आणि पोरकी झालेली कुटुंबं संपूर्ण शहराला आयुष्यभर टोचत राहतील.

मराठी बातम्या/पुणे/

Moshi Accident: त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं ९ जणांना गिळलं, 83 तासांत काय घडलं? मोशी दुर्घटनेचा थरकाप उडवणारा घटनाक्रम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *