सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर (Solapur Crime News) शनिवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime News) समोर आली आहे. ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी रेल्वेच्या डब्यांमध्ये घुसून महिलांसह प्रवाशांना बेदम मारहाण केली आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केले. या थरारक घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime News: ७४ मिनिटे गाडी थांबल्याचा साधला फायदा
यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तांत्रिक कारणांमुळे तडवळ स्थानकावर तब्बल ७४ मिनिटे उभी होती. याच संधीचा फायदा घेत ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी रेल्वेच्या एस-४ (S-4), एस-६ (S-6) आणि एस-७ (S-7) या डब्यांमध्ये प्रवेश केला. काही दरोडेखोरांनी थेट डब्यात घुसून, तर काहींनी खिडकीतून हात घालून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली.(Solapur Crime News)
Solapur Crime News: विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक; राजस्थानचा प्रवासी जखमी
लूटमारी दरम्यान दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण केली. प्रवाशांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या हल्ल्यात ‘एस-६’ कोचमधील सीट क्रमांक ५३ वरून प्रवास करणारे कालूराम भाटी (रा. पाली, राजस्थान) यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या चेहऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू होता, त्यांच्यावर आरपीएफने (RPF) तातडीने प्राथमिक उपचार केले.
Solapur Crime News: ५ तोळ्यांची सोन्याची चैन लंपास
या घटनेत ‘एस-७’ डब्यातून प्रवास करणारे सोलापूरचे प्रवासी महेश गोपाळ पवार (वय ३४, रा. पूर्व मंगळवार पेठ) यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची (किंमत सुमारे १ लाख ४३ हजार ५०० रुपये) सोन्याची चैन दरोडेखोरांनी हिसकावून नेली. याशिवाय इतर तीन प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्यही लुटले गेले. दरोडा पडल्यानंतर डब्यातील प्रवाशांनी आरडाओरडा करत मदतीची याचना केली.
Solapur Crime News: रेल्वे पोलीस आणि प्रशासन ॲक्शन मोडवर
रेल्वेच्या मदत क्रमांकावर (Help-line) तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पहाटे ४.५८ वाजता ही गाडी सोलापूर स्थानकावर पोहोचताच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे पथक दाखल झाले. महेश गोपाळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून, रेल्वे पोलीस अज्ञात दरोडेखोरांचा वेगाने शोध घेत आहेत.