Maharashtra Police Department : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश पोलीस स्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींनुसार तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या मोठ्या फेरबदलामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IPS Officer Transfer : DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिवाजी राठोड यांची नागपूरहून ठाणे शहरात अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद शेवाळे यांची एटीएस (ATS) पुणे येथून नवी मुंबई गुन्हे शाखेत अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय, विनीता साहू यांना एसआरपीएफ (SRPF) मुंबई येथे DIG पदाची जबाबदारी देण्यात आली असून अशोक दुधे यांची ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. आर. राजा यांना पदोन्नती देत अपर पोलीस आयुक्त मुंबई येथे नेमण्यात आले आहे.
Thane Crime Branch : ठाणे आणि मुंबईत नवे अधिकारी
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये शीला साईल यांची मुंबई शहरात डीसीपी (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील, विवेक पानसरे आणि निलेश सोनावणे या अधिकाऱ्यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. श्रीकांत परोपकारी यांच्याकडे तटीय सुरक्षा विभागाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच रविंद्र परदेशी यांची SRPF गट-1 पुणे येथे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Superintendent of Police Transfer : ग्रामीण भागातील बदल्या आणि नियुक्त्या
ग्रामीण आणि इतर जिल्ह्यांमध्येही गृह विभागाने नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये प्रकाश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती झाली आहे. तर विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. संभाजी कदम यांना ATS पुणे येथे SP म्हणून जबाबदारी देण्यात आली असून विवेक पाटील यांच्याकडे सीआयडी (CID) पुणेची धुरा सोपवण्यात आली आहे.
Pune Narcotics Task Force : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फेरबदल
तसेच संजय सरगुंडा पाटील आणि अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) येथे DCP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रांत देशमुख यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली आहे. प्रिती टिपरे यांची एफडीए (FDA) मुंबई येथे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंमत जाधव यांच्याकडे पुणे येथे नार्कोटिक्स टास्क फोर्सची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Transfer Orders Suspended : काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती
दरम्यान, या मोठ्या बदल्यांच्या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या बदली आदेशांना प्रशासनिक कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये कुमार चिंथा, नित्यानंद झा, अकबर पठाण आणि दिपक गिऱ्हे यांच्या बदली आदेशांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृह विभागाच्या आदेशात देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा