मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं सूचक विधान
राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील इन्कमिंग सुरू असतानाच आता मोठं ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या पुन्हा चिरफळ्या उडतील असा कयास लावला जात आहे. या चर्चांचा उद्धव ठाकरे गटानेही मोठा धसका घेतला आहे. त्यामुळेच ठाकरेंनी उद्या मुंबईत खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतंय? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ममता बॅनर्जींचे खासदार फुटलेच ना? ज्याला जायचं तो जातोच, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
गुलाबराव पाटील मीडियाशी बोलत होते. बैठक घेणे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काम आहे. ऑपरेशन टायगर वगैरे आमचं काहीच नाही. शिवसेनेमध्ये या… असं काही आम्ही कोणी म्हणत नाहीये. मात्र लोक इकडून तिकडे का जात आहेत? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चेत मी नसल्यामुळे मला त्याबद्दल काही माहिती नाही, असं सांगतानाच कितीही रोखला.. आता टीएमसीच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फुटलेच ना? ज्याला जायचं आहे तो जातोच, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
राऊतांनाच पश्चात्ताप
ज्यांना पश्चात्ताप झाला असेल त्यांनी मातोश्रीवर यावं, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. कोणाला पश्चाताप झालेला आहे? संजय राऊत हे पश्चातापाचे महामेरू आहेत का? त्यांना पश्चाताप होतोय की काय असे मला वाटायला लागलं आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आज अधिकृत घोषणा
काल शिवसेनेच्या आमदारांची आणि भाजपच्या मंत्र्यांची विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. आजही महायुतीची बैठक होत आहे. या बैठकीला महायुतीचे आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीची भूमिका स्पष्ट होणार आहे. जळगावमधील रेश्मा काळे यांच्या बंडखोरीचा बॉल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे होता आणि त्यांच्या आदेशानुसार आज महायुतीच्या बैठकीत अधिकृत घोषणा होईल. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आता महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे स्पष्ट झाले आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
मतदार राजाकडे जावंच लागेल
आम्ही आमदारांनी केलेल्या मेहनतीमुळे उमेदवार निवडून येत असतात. सगळ्या आमदारांनी आता म्हटल्यानंतर ही निवडणूक सोपी होणार आहे, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे गिरीश महाजन यांच्या संपर्कात असतील. मला त्याबद्दल काय माहिती नाही. माघार झाली असली तरी बैठक घ्यावीच लागेल. कारण बैठकीच्या माध्यमातूनच पुढच्या काळातले दौरे ठरतील. मत देणारा मतदारराजा हा शहरांमध्ये बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तर जावंच लागेल ना? असं ते म्हणाले.