Dam Water Storage Maharashtra: गेल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाअभावी पाणीटंचाईचा सावट आणखी गडद झाले आहे. खरीप पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.आणखी पाऊस लांबल्यास राज्यात पुन्हा पाणीटंचाई डोकं वर काढते की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान महाराष्ट्राच्या मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 44.56% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी हा साठा 60.53% एवढा होता. पाहूया विभागनिहाय कुठे किती पाणीसाठा आहे..
विभागनिहाय कुठे किती पाणीसाठा ?
जलसंपदा विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार लघु मध्यम आणि मोठ्या धरणांचा सध्या पाणीसाठा हा यंदा 44.56 टक्क्यांवर आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 25.39% उपयुक्त पाणीसाठा असून महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी पाणीसाठा आहे.पुणे विभागातील धरणांमध्ये सध्या 52.71% जलसाठा असून गेल्यावर्षी याच सुमारास हा साठा 72.18 टक्क्यांवर होता. कोकणातील धरण सध्या 62.6 टक्क्यांनी भरलेली आहेत.तर नाशिकच्या धरणांमध्ये सध्या 41.72% पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये 39.76% आणि 42.26% पाणीसाठा सध्या उरलाय.कोकण विभागातील धरणेच 62.06% भरलेली आहेत.
जायकवाडी धरणात किती पाणी शिल्लक ?
मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण समजले जाणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या केवळ 31.41% पाणीसाठा शिल्लक आहे.गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 76.38% एवढा होता. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात आज 681.86 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. बीडमधील माजलगाव धरण 16.73 टक्क्यांवरती आहे तर मांजरा धरणात 16.64% पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण शून्यावर असून येलदरी धरणात 51.93% पाणीसाठा आहे.नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 34.97% पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशिवचं सीना कोळेगाव शून्यावर असून निम्न तेरणा धरणात 30.28% पाणी शिल्लक आहे.परभणीच्या निम्न दुधनामध्ये 23.95% पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा ?
पुण्यातील खडकवासला धरणात सध्या 88.75% पाणी आहे. तर पानशेत धरणात 61.6% पाणीसाठा आहे.पवना धरण 67.21 टक्क्यांनी भरले असून भाटघर 52.62 टक्क्यांवर आहे.सांगलीतील वारणा धरण 51.36% भरलं असून साताऱ्यातील कोयना धरण 49.16 टक्क्यांवर आहे.सोलापुरातील उजनी धरण 53.48 टक्क्यांवर असून गेल्यावर्षी याच सुमारास उजनी 93 टक्क्यांनी भरले होते.
महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे सावट
महाराष्ट्रातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अगदी कमी पाणी साठा शिल्लक आहे. मराठवाडा,विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट आहे. येतं काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागू शकतो.
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?