Vitiligo : ‘कोड’ हा एक त्वचेचा आजार आहे. यामध्ये आपल्या त्वचेतील रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलॅनोसाइट्स पेशी नष्ट होतात व त्वचेवर सफेद रंगाचे डाग दिसू लागतात. हा आजार संसर्गजन्य नसला आणि शारीरिकदृष्ट्या घातक नसला तरी तो एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. व्हिटिलिगो या विकाराबद्दल नागरिकांमध्ये गैरसमज दूर करुन जनजागृती करण्यासाठी तसेच कोडाने ग्रस्त असलेल्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक कलंकाची भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आव्हानांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिन पाळला जातो.अनेक व्यक्तींच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई येथील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. छाया वाजा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोड नेमके कसे होते? (Vitiligo)
डॉ. छाया वाजा सांगतात, कोड हा मुख्यतः ऑटोइम्यून स्वरूपाचा आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मेलॅनोसाइट्सवर हल्ला करते. कोड असलेल्या काही रुग्णांमध्ये व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन डी, फॉलिक अॅसिड तसेच झिंकसारख्या खनिजांची कमतरता आढळू शकते. मात्र या कमतरता थेट कोडाचे कारण नसतात. त्या त्वचेच्या आरोग्यावर आणि आजाराच्या प्रगतीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा पोषक घटकांच्या कमतरता भरून काढणे हे उपचारांच्या योजनेचा एक भाग ठरू शकते
धूम्रपान, मद्यपानावर नियंत्रण गरजेचे आवश्यक
त्या पुढे सांगतात की, त्वचेच्या आरोग्यामध्ये जीवनशैलीचाही महत्त्वाचा वाटा असतो. धूम्रपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाह वाढतो, ज्यामुळे कोडासारख्या ऑटोइम्यून आजारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच अतिमद्यपानामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपानासारखी सवय टाळणे आणि मद्यपानावर नियंत्रण गरजेचे आवश्यक आहे. यामध्ये आनुवंशिकतेचाही काही प्रमाणात संबंध असू शकतो. कुटुंबात कोडाचा वैद्यकीय इतिहास असल्यास हा आजार होण्याचा धोका किंचित वाढू शकतो. मात्र त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईलच असे नाही. पर्यावरणीय आणि रोगप्रतिकारक घटकांचाही यात सहभाग असतो.
व्हिटिलिगोसंबंधीत काही गैरसमजूती आणि त्यामागची वास्तविकता
गैरसमज : कोड हा स्पर्शाने पसरतो.
वास्तविकता: व्हिटिलिगो हा संसर्गजन्य नाही. स्पर्श, अन्न सामायिक करणे किंवा एकत्र राहणे यामुळे तो पसरत नाही.
गैरसमज : अस्वच्छतेमुळे कोड होतो.
वास्तविकता : कोड येणे याचा वैयक्तिक स्वच्छतेशी कोणताही संबंध नाही. हा एक ऑटोइम्यून विकार आहे.
गैरसमज : कोड असलेल्या व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत नाहीत, विवाह करू शकत नाहीत किंवा यशस्वी करिअर घडवू शकत नाहीत.
वास्तविकता : कोड केवळ त्वचेच्या रंगद्रव्यावर परिणाम करतो. तो व्यक्तीच्या शारीरिक क्षमता, प्रजननक्षमता किंवा जीवनमानावर परिणाम करत नाही.
गैरसमज : कोड हा केवळ वयोवृद्धांमध्येच होतो.
वास्तविकता : हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुले, किशोरवयीन आणि प्रौढांमध्येही तो आढळून येऊ शकतो.
कोड व्यवस्थापनासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे, डॉक्टरांनी सुचविलेले उपचार नियमितपणे करणे, त्वचेचे अतिसूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे आणि त्वचेचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. योग, ध्यानधारणा, तणावाचे नियंत्रण नियंत्रण, सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि नियमित फॉलो-अप यामुळे रुग्णांना मानसिकदृष्ट्याही मदत मिळू शकते,असे डॉ. वजा यांनी स्पष्ट केले.
रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातही कोडासाठी सेल बेस थेरेपी हा एक आशादायी पर्याय ठरतो. कोड असलेल्या रुग्णांमध्ये स्टेम सेल थेरपीद्वारे त्वचेतील रंगद्रव्य पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. एक्सोसोम्स, माइटोकॉन्ड्रियल सहाय्य, तसेच एचडीएसी(HDAC) इनहिबिटर्स, एचएटी(HAT) अॅक्टिव्हेशन, TTK21 आणि IMCY-009 यांसारख्या एपिजेनेटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मेलॅनोसाइट्सची कार्यक्षमता पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संशोधन अद्याप सुरू असले तरी या उपचारपद्धतींमुळे त्वचेचे रंगद्रव्य सुधारण्यास, आत्मविश्वास वाढविण्यास आणि जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचे निष्कर्ष पहायला मिळत आहेत. याशिवाय व्हिटॅमिन डी आणि कॅल्सिट्रिऑल हे मेलॅनोसाइट्सची कार्यक्षमता वाढविण्यास, रोगप्रतिकारक यंत्रणेचे संतुलन राखण्यास आणि त्वचेमध्ये पुन्हा रंगद्रव्य निर्माण होण्यास मदत करू शकतात असे रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण