Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 259 रनचं आव्हान टीम इंडियाने 45.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 259 रनचं आव्हान टीम इंडियाने 45.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. कर्णधार शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. गिलने 75 बॉलमध्ये 80 रन केले तर अक्षर पटेलने नाबाद 57 आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 रनची खेळी केली. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात नाबाद शतकी पार्टनरशीप झाली.
शुभमन गिल 80 रनवर खेळत असताना त्याने 11 फोर आणि एक सिक्स लगावली होती. तेव्हा तो वनडे करिअरमधलं त्याचं 10 वे शतक झळकावेल असं वाटत होतं, पण गिलला अचानक मैदान सोडावं लागलं. पायाला दुखापत झाल्यामुळे गिल रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये गेला.
26 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला गिलने जॉश टंगच्या बॉलिंगवर कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच गिलला त्रास व्हायला सुरूवात झाली आणि त्याने पाय पकडला. यानंतर खेळ थांबवला गेला आणि टीम इंडियाचे फिजियो मैदानात आले. फिजियोने प्रथमोपचार केल्यानंतरही गिलचा त्रास कमी होत नव्हता, त्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन जाण्यात आलं. गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला.
इतिहास घडवण्याचा चान्स हुकला
गिलला रिटायर्ड हर्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये जाणं कायमच बोचत राहिल कारण इंग्लंडमध्ये इतिहास घडवण्याची गिलची संधी हुकली. इंग्लंडच्या जमिनीवर कोणत्याही भारतीय कर्णधाराला वनडेमध्ये शतक करता आलं नाही, त्यामुळे गिलला ही सुवर्णसंधी चालून आली होती, पण 20 रननी गिलचं शतक हुकलं. पण सुंदर आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाचा विजय निश्चित करून भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.
अक्षर पटेलने नाबाद अर्धशतक करण्याआधी बॉलिंगमध्येही 4 विकेट घेतल्या, त्यामुळे अक्षर पटेलला प्लेयर ऑफ मॅच देऊन गौरवण्यात आलं. या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात आऊट झाले. रोहितने 11 आणि विराटने 5 रन केले. सीरिजची दुसरी वनडे गुरूवारी कार्डिफमध्ये होणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 14, 2026 11:59 PM IST
