मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी मागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या भेटीची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कोणत्या कारणासाठी घेणार? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही
दरम्यान, अचानक जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटतरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चां रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार का? अशी देखील चर्चा सुरु आहेत. दरम्यान, जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कोणत्या कारणासाठी घेणार आहेत? हे मात्र अद्याप समजलेलं नाही.
जवळपास सव्वा तास तिघांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
दरम्यान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील वर्षा बंगल्यावरून रवाना झाले आहेत. जवळपास सव्वा तास तिघांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सुरुवातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील देखील वर्षावर पोहोचले होते. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
तीन बडे नेते एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर हा योगायोग असूच शकत नाही : अमोल मिटकरी
तीन बडे नेते एकत्र येऊन जर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटत असतील तर हा योगायोग असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. ही महाराष्ट्रातील राजकारण परिवर्तनाची नांदी असल्याचे मिटकरी म्हणाले. कालच जयंत पाटील यांनी आमदार आणि खासदारांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. काही आमदार आणि खासदार एनडीएमध्ये सामील होण्यास तयार असल्याची माहिती मिटकरींनी दिली,
जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील : अंकुश काकडे
जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात किंवा अन्य काही कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असतील, तर त्यात विशेष काही नाही. त्यात राजकारण आहे असं म्हणता येणार नाही असे मत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी एबीपी माझाला सांगितले. सुनील तटकरे आणि जयंत पाटील ठरवून गेले असतील असं मला वाटत नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी कोणीही जाऊ शकते असे काकडे म्हणाले.
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया