Last Updated:
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला 47.5 ओव्हरमध्ये 258 रनवर रोखलं.
बर्मिंघम : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला 47.5 ओव्हरमध्ये 258 रनवर रोखलं. जो रूटने सर्वाधिक नाबाद 76 रन केले, तर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या लियाम डॉसनने 68 आणि ओपनर बेन डकेटने 43 रनची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांना 2-2 तर जसप्रीत बुमराह, शिवम दुबे यांना 1-1 विकेट मिळाली.
केएल राहुलची विकेट कीपिंग
केएल राहुल या सामन्यात विकेट कीपर म्हणून खेळत आहे. सुरूवातीला विकेट कीपिंगमध्ये राहुलकडून काही चुका झाल्या, पण शिवम दुबेच्या बॉलिंगवर केएल राहुलने विल जॅक्सचा उत्कृष्ट कॅच पकडला. राहुलने सुपरमॅनसारखी उडी मारून एका हातात बॉल पकडून विल जॅक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राहुलचा हा कॅच पाहून विल जॅक्सलाही विश्वास बसला नाही आणि काही वेळासाठी तो पिचवरच उभा राहिला. विल जॅक्सच्या या विकेटनंतर मॅचचं चित्र बदललं
शिवम दुबेला 2 वर्षांनंतर मिळाली विकेट
हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांना दुखापत झाल्यामुळे शिवम दुबेची शेवटच्या क्षणी टीम इंडियात निवड करण्यात आली. दुबेने त्याला मिळालेल्या या संधीचं सोन केलं. 6 ओव्हरमध्ये त्याने फक्त 27 रन देऊन 1 विकेट घेतली. शिवम दुबेची वनडे क्रिकेटमधली ही दुसरीच विकेट आहे. याआधी ऑगस्ट 2024 साली शिवम दुबेला वनडे क्रिकेटमध्ये पहिली विकेट मिळाली होती.
टीम इंडिया विजयाच्या प्रतिक्षेत
आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली, पण आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये 4-0 ने पराभव झाला, त्यामुळे टीम इंडिया अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 14, 2026 10:41 PM IST
