Team India playing 11 vs Afghanistan 2nd T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (15 सप्टेंबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची नजर आता मालिकेत 2-0अशी विजयी आघाडी घेण्यावर असेल. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला या सामन्यात वरुण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन यांच्याशिवाय मैदानात उतरावे लागू शकते. वरुण दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संधी मिळू शकते.
वरुण चक्रवर्ती मालिकेतून OUT
वरुण चक्रवर्तीबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टी-20मध्ये त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश होणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. वरुणच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, वॉशिंग्टन सुंदर हा देखील संघासमोरचा पर्याय आहे. सुंदरला संधी मिळाल्यास भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते.
संजू सॅमसनलाही बसणार डच्चू?
पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनला सलामीला पाठवण्यात आले होते. मात्र, त्याला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाही. संजूने 8 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने फक्त 10 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्याची शक्यता आहे. संजूच्या जागी अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते. पहिल्या टी-20मध्ये वैभवला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून मायदेशात पदार्पण करताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी भारतात त्याचा अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. त्यामुळे दिल्लीतील सामना त्याच्यासाठी खास ठरू शकतो.
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी भारताच्या प्लेइंग-11 : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई/वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा –