Ganeshotsav Health Tips: गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण मोदक, लाडू, पुरणपोळी, रसमलाई, गुलाबजामून आणि इतर अनेक प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतात. मात्र, गोड पदार्थ खाताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी, पोट फुगणे आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो कमी खावेत किंवा त्यांचे प्रमाण ठरवून घ्यावे. उदाहरणार्थ, दिवसातून एकच गोड पदार्थ खाणे योग्य ठरू शकते. त्यामुळे या गणेशोत्सवात चविष्ट पदार्थांचा आनंद घेतानाच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या आणि पोटाच्या समस्या टाळा. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विशाल सेठ यांनी पचनाच्या समस्या टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
गणेशोत्सव हा आनंद, उत्सव, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आणि पारंपरिक पदार्थांचा आनंद घेण्याचा काळ आहे. या काळात लोक विविध ठिकाणी जातात, कुटुंबीय आणि मित्रांच्या घरी गणेशदर्शनासाठी भेट देतात. अशा वेळी अनेकजण आपल्या नेहमीच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि भरपूर गोड पदार्थ खातात. नंतर पुन्हा आहाराची काळजी घेऊ, असा विचार केला जातो.मोदक, लाडू, पुरणपोळी आणि इतर सणासुदीचे पदार्थ हे गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहेत.मात्र, सलग अनेक दिवस जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.त्यामुळे अॅसिडिटी, पोट फुगणे, पोट जड होणे आणि पोटात अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात.त्यामुळे सणासुदीच्या पदार्थांचा आनंद घ्या, पण ते मर्यादित प्रमाणात खा. अधूनमधून खाण्याची सवय रोजची होऊ देऊ नका.
पचनसंस्थेवर काय परिणाम होतो?
सणाच्या काळात लोक घरी, नातेवाईकांच्या घरी किंवा गणेश मंडपांना भेट देताना मिठाई खातात. त्यामुळे दिवसभरात आपण किती गोड पदार्थ खाल्ले आहेत, हे अनेकदा लक्षातही येत नाही. पारंपरिक मिठाईंमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो आणि पोट जड किंवा फुगल्यासारखे वाटू शकते. काही लोकांमध्ये जास्त खाल्ल्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अन्न वर येण्याचा त्रास वाढू शकतो.गॅस आणि अपचनाच्या तक्रारीही होऊ शकतात.
शक्य असल्यास गोड पदार्थ टाळणे चांगले. मात्र, ते पूर्णपणे टाळणे शक्य नसेल, तर त्याचे प्रमाण कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवसातून फक्त एक मोदक किंवा इतर एकच मिठाई खा. अन्न घाईघाईने न खाता हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा. एकापाठोपाठ जड जेवण करू नका. यामुळे पचनसंस्थेवर जास्त ताण येऊ शकतो. गोड पदार्थांसोबत तळलेले पदार्थ आणि जड जेवण घेतल्यास पचनासाठी आणखी त्रास होऊ शकतो.
ज्यांना आधीपासून अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांना जास्त खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे किंवा पोटात अस्वस्थ वाटणे अशा समस्या अधिक जाणवू शकतात. गणेशोत्सवाच्या काळात आणखी एक सामान्य समस्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलणे. कुटुंबीयांच्या घरी नंतर जेवण होणार आहे, हे माहीत असल्यामुळे काहीजण नेहमीच्या वेळचे जेवण टाळतात. त्यानंतर जेव्हा जेवण मिळते, तेव्हा ते खूप जास्त प्रमाणात खाल्ले जाते. दिवसभर मिठाई आणि स्नॅक्स खाल्ल्यानंतर रात्री उशिरा जड जेवण केल्यानेही काही लोकांमध्ये अॅसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो.
पचनाच्या समस्या टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
पचनाच्या समस्या टाळण्यासाठी गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाताना त्यांचे प्रमाण कमी ठेवा. पुरेसे पाणी प्या आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवा. दररोज ४५ मिनिटे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. दिवसभर शक्य तितके सक्रिय राहा आणि सतत बसून राहणे टाळा. जड जेवण करू नका. प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ आहारात घ्या. सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा. जर तुम्हाला वारंवार खूप जास्त अॅसिडिटी होत असेल, सतत पोटदुखी होत असेल, उलट्या होत असतील, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होत असेल किंवा कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्यांसाठी केवळ सणासुदीचे जास्त खाणे कारणीभूत आहे असे समजू नका. अशा वेळी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणजेच पोट आणि पचनसंस्थेच्या आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.