IND vs AFG: रोहित शर्मा-शुबमन गिलने केली एक चूक, रहमानुल्लाह गुरबाजने ठोकलं आक्रमक शतकImage Credit source: BCCI Twitter
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना चार तास उशिराने सुरू झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययानंतर 25-25 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. या सामन्यावर भारत पकड मिळवेल असं वाटलं होतं. पण रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा एक निर्णय चुकला आणि भारताला 91 धावांचा फटका बसला. कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्माने निर्णय क्षमता दाखवली असती तर गुरबाज फक्त 11 धावांवर तंबूत परतला असता. रहमानुल्लाह गुरबाजने 51 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार मारत 102 धावा केल्या. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.
रोहित-गिलच्या चुकीमुळे भारतीय संघाला फटका
रहमानुल्लाह गुरबाजने 48 चेंडूत शतक पूर्ण केलं. अफगाणिस्तानसाठी सर्वात वेगाने शतक पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध हे दुसरं सर्वात जलद वनडे शतक आहे. शाहिद आफ्रिदीनंतर भारताविरुद्ध वनडे सामन्यात 50 पेक्षा कमी चेंडूत शतक करणारा फलंदाज ठरला आहे. शाहिद आफ्रिदीने 2005 मध्ये भारताविरुद्ध 45 चेंडूत ही कामगिरी केली होती. रहमानुल्लाह गुरबाजला स्वस्तात बाद करण्याची संधी आली होती. भारताकडून तिसरं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग मैदानात आला होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीपने एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पण पंचांनी नाबाद दिलं. पंचांच्या नकारानंतर भारताकडे डीआरएस घेण्याची संधी होती. पण भारतीय संघात गोंधळाची स्थिती होती आणि डीआरएस घेतला नाही.
रहमानुल्लाह गुरबाजच्या पॅडला चेंडू लागण्यापूर्वी बॅटला लागला असा रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा अंदाज होता. पण जेव्हा टीव्ही स्क्रिनवर रिप्ले दाखवला गेला तेव्हा भारतीय चाहते आणि संघाला धक्का बसला. कारण त्याच्या बॅटला चेंडू लागलाच नव्हता आणि एलबीडब्ल्यू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. जर भारताने रिव्ह्यू घेतला असता तर पंचांना निर्णय बदलावा लागला असता. पण शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघंही निर्णय घेताना चुकले. त्याचा पुरेपूर फायदा रहमानुल्लाह गुरबाजने घेतला आणि शतकी खेळी करून गेला. अफगाणिस्तानने 24.5 षटकात सर्व गडी गमवून 164 धावा केल्या आहेत आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे.