Gold नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोने तारण कर्जाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सोने तारण कर्ज घेताना बँकेकडे सोने तारण म्हणजे गहाण ठेवावं लागतं. मात्र, सोने तारण कर्जाची परतफेड करण्यापूर्वी बँकेत तारण असलेल्या सोन्याची चोरी झाल्यास नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्न निर्माण होतो. खरंतर या प्रकरणात बँकेची जबाबदारी आणि नुकसानभरपाई काही गोष्टींवर अवलंबून असते.
तारण असलेल्या सोन्याची चोरी झाल्यास काय करायचं?
जर तुम्हाला माहिती झालं की तारण ठेवलेल्या सोन्याची चोरी झाली आहे तर बँकेला याबाबत लगेचच माहिती द्या. बँकेकडून या घटनेसंदर्भात लेखी माहिती आणि पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या एफआयआरची प्रत मागा. बँकेसोबत झालेली चर्चा आणि सर्व कागदपत्रं सुरक्षित ठेवावीत. चर्चेदरम्यान बँकेकडून चोरी कोणत्या स्थितीत झाली आणि नुकसानभरपाई कशी मिळणार याबाबत कोणती प्रक्रिया राबवली जाईल याबाबत लेखी घ्यावं.
नुकसानभरपाईसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक ?
सोने जमा करताना मिळालेली पावती, सोने तारण कर्जाचा करारनामा, गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्यांकनाचा रिपोर्ट यासारखी कागदपत्रं जपून ठेवावीत. या कागदपत्रांद्वारे तुमचं सोनं बँकेकडे जमा केलं होतं हे सिद्ध करता येईल. याशिवाय सोन्याचे फोटो आणि सोने खरेदीच्या पावत्या सुरक्षित ठेवा.
बँका व्याजासह पैसे देतील का?
सर्वसाधारणपणे चोरी झाल्यानंतर भरपाईची रक्कम आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाबाबात निर्णय प्रकरणाची परिस्थिती, बँकेची जबाबदारी, विमा, कायद्यानुसार निश्चित केली जाते. दरम्यान, प्रत्येक प्रकरणांमध्ये सोन्याच्या पूर्ण मूल्यांकनाप्रमाणं रक्कम आणि व्याज मिळेलच का हे सांगता येत नाही.