गिलचा धुडगूस अन् अर्शदीपची केली धुलाई! टीम इंडियाचे दोन स्टार आमनेसामने, मोहालीत नेमकं काय घडलं?


Sher e punjab T20 League 2026 : शेर-ए-पंजाब टी-20 लीग 2026 मधील 15व्या सामन्यात रविवारी (6 सप्टेंबर) मोहालीच्या मैदानावर टीम इंडियाचे दोन स्टार आमनेसामने आले. भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. या सामन्यात गिलने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली, तर अर्शदीपसाठी गोलंदाजीचा दिवस मात्र निराशाजनक ठरला. या हंगामातील आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी फाजिल्का फाल्कन्सकडून सलामीला आलेल्या शुभमन गिलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. समोर लुधियाना लायन्सचा कर्णधार अर्शदीप सिंग असतानाही गिल अजिबात दबावात दिसला नाही.

सामन्याच्या तिसऱ्या षटकात गिलने अर्शदीपच्या गोलंदाजीवर चांगलाच समाचार घेतला. षटकातील पाचव्या चेंडूवर गिलने डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अप्रतिम चौकार ठोकला. त्यानंतर पुढच्याच कायदेशीर चेंडूवर त्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखी एक चौकार लगावत सलग दोन चौकार वसूल केले. गिलच्या या आक्रमक फलंदाजीमुळे फाजिल्का फाल्कन्सला दमदार सुरुवात मिळाली.

अर्शदीपची गोलंदाजी ठरली महागडी (Arshdeep Singh Sher e punjab T20 League 2026)

दुसरीकडे, लुधियाना लायन्सचा कर्णधार अर्शदीप सिंगसाठी हा सामना विसरण्यासारखा ठरला. त्याने आपल्या चार षटकांच्या कोट्यात तब्बल 51 धावा खर्च केल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याची इकॉनॉमी तब्बल 12.80 इतकी राहिली. विशेष म्हणजे अर्शदीपने आपल्या स्पेलमध्ये 1 नो-बॉल आणि 3 वाइड्स टाकल्या. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त धावांचाही भार पडला. विरोधी फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

गिलची 21 चेंडूंत 40 धावांची आतषबाजी (Shubman Gill Sher e punjab T20 League 2026)

शुभमन गिल शानदार लयीत फलंदाजी करत होता. मात्र त्याला आपली ही आक्रमक सुरुवात अर्धशतकात रूपांतरित करता आली नाही. गिलने अवघ्या 21 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावांची तुफानी खेळी केली. तो फाजिल्का फाल्कन्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र कार्तिक चड्ढाने गिलला बाद करत त्याच्या धडाकेबाज खेळीला ब्रेक लावला.

हे ही वाचा –

Duleep Trophy 2026 Final : ईशान किशनचं वादळी शतक; वैभव-तिलक अंगावर धावून आले, आगरकरांचा फोटो व्हायरल; पहिल्या दिवशी नेमकं काय-काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *