Ganesh Chaturthi 2026 : देशभरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी तसेच, सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) खास असणार आहे. कारण या दिवशी गणेशोत्सव आणि हरतालिका (Hartalika) दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे आधी हरतालिकेची पूजा करावी की गणपतीची? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती आपण जाणून घेऊयात.
हरितालिका आणि गणपती एकाच दिवशी
पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी हरितालिका आणि गणपती एकाच दिवशी आहेत. मात्र, अशी वेळ पहिल्यांदाच आलेली नाही. या आधीही अनेक वेळा हरितालिका आणि गणपती एकाच दिवशी आले आहेत.
तसेच, हरितालिका आणि गणपती या दोघांची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्या कारणाने तुम्ही कोणीतीही पूजा आधी किंवा कोणतीही पूजा नंतर करु शकता. तृतीया समाप्ती सकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असल्याने त्यापूर्वी हरितालिकापूजन केलं पाहिजे असं नाही ब्रम्ह मुहूर्तापासून मध्यान्यपर्यंत कोणीतही पूजा आधी आणि कोणतीही पूजा नंतर आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने करु शकतो.
यावर्षीचा गणेशोत्सव हा 2017 नंतर पहिल्यांदा 12 दिवसांचा आलेला आहे. 14 ते 25 सप्टेंबर पर्यंतचा गणेशोत्सव असेल.
गणेश चतुर्थी महत्त्व 2026 (Importance Of Ganesh Chaturthi 2026)
गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची विधीवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धीचं आगमन होतं. बाप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच, श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
गणपती पूजेची यादी (List Of Ganpati Puja)
हळद, कुंकू, शेंदूर, अबीर, गुलाल, अक्षता, गंध, फुले, हार, दूर्वा, बेल, पत्री, नारळ दोन, फळे पाच, विड्याची पाने 10, सुपा-या पाच, सुटे पैसे, गूळ खोबरे, पंचामृत, उदबत्ती, निरांजन, कापूर, अत्तर, काडेपेटी, कापसाचे वस्त्र, जानवीजोड, पळी भांडे 1, ताम्हन 1, तांब्या 1, नैवेद्याला पेढे/मोदक.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Ganesh Chaturthi 2026 : गणपतीची मूर्ती खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टी आवर्जून टाळा, गणपती पूजेचे नियम आणि मूर्तीशी संबंधित वाचा A to Z माहिती