Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI


Eng vs Ind 1st ODI Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला 0-4 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. आता भारतीय संघासमोर वनडे मालिकेत पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान आहे. 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असून, या मालिकेत भारत विजयाने सुरुवात करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. टी-20 मालिकेत भारतीय फलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले, तर गोलंदाजांनाही इंग्लिश फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. त्यामुळे वनडे मालिकेसाठी संघ व्यवस्थापन काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.

विराट कोहली खेळणार की नाही?

या मालिकेसाठी विराट कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असला, तरी तो खेळणार का हे अद्याप निश्चित झालं नाही. आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो पुनर्वसन प्रक्रियेत असून, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याची फिटनेस चाचणी झाली आहे. या चाचणीनंतर तो लंडनला गेला, पण विराट पहिल्या वनडेसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत सामन्याआधीच अंतिम निर्णय घेतला जाईल.

रोहित-शुभमन सलामीला

जर विराट कोहली पहिल्या वनडेसाठी अनुपलब्ध राहिला, तर रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर उपकर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीस येऊ शकतो. त्यानंतर इशान किशन आणि अनुभवी केएल राहुल मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. अष्टपैलू विभागात शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल, तर फिरकीची धुरा कुलदीप यादव सांभाळू शकतो.

वेगवान गोलंदाजीवर बुमराहची भिस्त

गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करेल. त्याला अर्शदीप सिंग आणि युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची साथ मिळू शकते. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर ही तिकडी प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे. टी-20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघासाठी ही वनडे मालिका प्रतिष्ठेची मानली जात आहे. अनुभवी खेळाडू आणि युवा क्रिकेटपटू यांच्या संतुलित मिश्रणासह टीम इंडिया इंग्लंडला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मात्र विराट कोहलीच्या फिटनेसवर पहिल्या सामन्याचे संघसंयोजन मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.
 
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी संभाव्य टीम इंडियाची प्लेइंग-11 :  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन,  केएल राहुल, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव,  अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रिन्स यादव

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)
16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)
19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)

हे ही वाचा –

CSK Head Coach Update : IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *