तुकाराम मुंढे इम्पॅक्ट, संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त


छ. संभाजीनगर : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या महिनाभरापासून कारवाईंचा धडाका लावला असून गावखेड्यातल्या पानपट्टीपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत अधिकारी पोहोचले आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (tukaram mundhe) यांनी या विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईला वेग आला असून दूध भेसळ, हॉटेल्स, मेडीकलसह इतरही ठिकाणी विभागाने धाडी टाकत कारवाई केली आहे. गेल्याच आठवड्यात छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात दूध (Milk) भेसळीची मोठी कारवाई केल्यानंतर आता खाद्यतेल कंपनीवरही छापा टाकून तब्बल सुमारे तीन कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगरात खाद्यतेलाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने दोन ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर धाड टाकून तब्बल 2 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. कारवाईदरम्यान अस्वच्छ वातावरण, वापरलेले डबे पुन्हा वापरणे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव आणि प्रयोगशाळेशिवाय तेलाचे पॅकिंग अशा गंभीर त्रुटी उघड झाल्या. या दोन्ही आस्थापनांचे परवानेही तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. 

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र‘ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 11 जुलै रोजी पैठण येथील बागरिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स या दोन ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत खाद्यतेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. तपासात वापरलेले टिन पुन्हा वापरले जात असल्याचे, यंत्रसामग्रीवर धूळ, गंज आणि घाण साचल्याचे, दुर्गंधीयुक्त तेलाचे टब, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्याचेही समोर आले. 

पामतेलासह विविध खाद्यतेल जप्त

दरम्यान, या कारवाईत पाम, सोयाबीन, कपाशी आणि अज्ञात वनस्पती तेलासह एकूण 2 कोटी 93 लाख 35 हजार 603 रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

मराठवाड्यात दुधाचे संकलन 1 लाख लिटरने घटले

 मराठवाड्यात बनावट दूध विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवाईचा मोठा परिणाम आता दिसू लागलाय. अशातच अवघ्या एका महिन्यात मराठवाड्यातील दूध संकलन तब्बल 1 लाख लिटरने घटलं (Milk Collection Dropped) आहे. एफडीएच्या (FDA) कारवाईमुळे भेसळयुक्त दूध (Adulterated Milk) विक्रीला आळा बसत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात बनावट आणि भेसळयुक्त दूध विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरात मोठी मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाया करण्यात आल्या. या कारवाईनंतर दूध संकलनात लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

हेही वाचा

लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *