जॉन अब्राहमने मुंबईत या ठिकाणी खरेदी केला 84 कोटींचा आलिशान बंगला, देश-विदेशात अनेक आलिशान मालमत्ता – Marathi News | John abraham buys 84 crore rupees luxurious bungalow in bandra west mumbai


बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम गेली दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असून अभिनयासोबतच आपल्या आलिशान जीवनशैलीमुळेही तो नेहमी चर्चेत असतो. आता जॉनने मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि महागड्या भागांपैकी एक असलेल्या वांद्रा पश्चिम येथे तब्बल 84 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. या व्यवहारामुळे त्याच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीत आणखी भर पडली आहे.

रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म ‘लियासेस फोरस’च्या माहितीनुसार, जॉन अब्राहमने वांद्रा पश्चिमेतील सेंट मार्टिन रोड परिसरात ही प्रीमियम फ्रीहोल्ड मालमत्ता विकत घेतली आहे. हा परिसर मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित निवासी भागांपैकी एक मानला जातो. या परिसरात अनेक नामांकित उद्योगपती, बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींची आलिशान घरे आहेत.

14 जुलै रोजी झाला व्यवहार

या मालमत्तेचा व्यवहार 14 जुलै 2026 रोजी पूर्ण झाला. सुमारे 1,017.60 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या प्लॉटवर हा बंगला उभारण्यात आला आहे. या मालमत्तेमध्ये 31.50 चौरस मीटरचे आउटहाऊस तसेच 193.12 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेला प्रशस्त बंगला आहे.

या व्यवहारासाठी जॉन अब्राहमने 5 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क भरली असून 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्कही अदा केले आहे. जॉन अब्राहमकडे आधीपासूनच देश-विदेशात अनेक आलिशान मालमत्ता आहेत. मुंबईतील वांद्रा परिसरातच तो समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका आलिशान डुप्लेक्स पेंटहाऊसमध्ये वास्तव्यास आहे. या घराची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय, द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मुंबईतील त्याचे तीन अपार्टमेंट्स भाड्याने देण्यात आले आहेत. तसेच GQच्या अहवालानुसार अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथेही त्याची एक लक्झरी मालमत्ता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लंडनमध्येही जॉन अब्राहमकडे एक आलिशान प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते.

आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता

कामाच्या आघाडीवर पाहता, जॉन अब्राहम लवकरच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

याशिवाय, त्याच्या लोकप्रिय ‘फोर्स’ मालिकेतील पुढील भाग ‘फोर्स 3’मध्येही तो पुन्हा एकदा एसीपी यशवर्धन सिंहच्या दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *