Cholesterol : भारतीयांच्या आरोग्याचं गंभीर वास्तव, दहापैकी नऊजणांची कॉलेस्टरॉलची पातळी सामान्य नाही, ICMR नं मांडली महत्त्वाची बाब, | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

ICMR च्या अहवालानुसार, भारतातील 87.3 टक्के प्रौढ व्यक्तींना, रक्तातील चरबीशी संबंधित काही ना काही असंतुलनाच्या समस्या भेडसावतायत. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढलेली असते, अथवा चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा कमी असते. दीर्घकाळ अशी स्थिती राहिली तर, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका यांचा धोका वाढू शकतो.

News18
News18

मुंबई : भारतीयांच्या आरोग्याचं गंभीर वास्तव मांडणारी माहिती. ICMR म्हणजेच Indian Council of Medical Research च्या अहवालानुसार दहापैकी नऊजणांची कॉलेस्टरॉलची पातळी सामान्य नाही असं समोर आलंय.

कोलेस्ट्रॉलच्या समस्यांचा संबंध केवळ वाढतं वय किंवा लठ्ठपणाशी आहे असं वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा. ICMR च्या अभ्यासानुसार, भारतातील दर दहा प्रौढांपैकी सुमारे नऊ जणांमधे कोलेस्ट्रॉलची पातळी असामान्य असल्याचं आढळून आलं आहे. ही समस्या केवळ वृद्धांपुरती मर्यादित नाही; तर तरुण आणि वरकरणी पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही याचा फटका बसत आहे.

ICMR च्या अहवालानुसार, भारतातील 87.3 टक्के प्रौढ व्यक्तींना, रक्तातील चरबीशी संबंधित काही ना काही असंतुलनाच्या समस्या भेडसावतायत. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढलेली असते, अथवा चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा कमी असते. दीर्घकाळ अशी स्थिती राहिली तर, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका यांचा धोका वाढू शकतो.

ही समस्या शहरी रहिवाशांमधे अधिक प्रमाणात आढळते असं या अभ्यासातून दिसून आलं आहे. शहरी भागातील 89 टक्के नागरिकांमधे कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य नव्हती, तर ग्रामीण भागात हे प्रमाण 86.5 टक्के होतं. ही समस्या आता केवळ शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही असं यावरून स्पष्ट होतं. तसंच, पुरुषांच्या तुलनेत महिलांमधे ही समस्या अधिक प्रमाणात असल्याचं आढळून आलं. अहवालानुसार, 83.5 टक्के पुरुषांच्या तुलनेत 91.1 टक्के महिलांमधे कोलेस्ट्रॉलशी संबंधित असामान्यता दिसून आली.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे भारतात 30 ते 39 वयोगटातील व्यक्तींमधे ही समस्या सर्वाधिक प्रमाणात दिसून येते. याचा अर्थ असा की, तुलनेनं कमी वयातच हृदयविकारांच्या वाढत्या धोक्याचा सामना करणारी संख्या भारतात मोठी आहे.

कोलेस्ट्रॉलची असंतुलित पातळी केवळ लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींपुरतीच मर्यादित नव्हती, यापैकी कोणतीही समस्या नसलेल्या सुमारे चाळीस टक्के व्यक्तींमधेही कोलेस्ट्रॉलची पातळी असंतुलित असल्याचं या अभ्यासातून आढळून आलं.

केवळ तंदुरुस्त दिसणं किंवा वजन सामान्य असणं म्हणजे हृदय पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री नव्हे. यासाठी तज्ज्ञ वेळोवेळी लिपिड प्रोफाईल चाचणी करून घेण्याचा सल्ला देतात. ही रक्ताची एक प्रमाणित चाचणी आहे, ज्याद्वारे शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल, चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी मोजली जाते. ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात आली, तर आहारविषयक बदल, नियमित व्यायाम आणि आवश्यक असेल तर औषधोपचार करुन त्यावर नियंत्रण मिळवता येतं.

निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल करणं आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणं हे हृदय निरोगी ठेवण्याचं सर्वात प्रभावी मार्ग आहेत. प्रकृतीत कोणताही बिघाड वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात उशीर करु नका. 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/

Cholesterol : भारतीयांच्या आरोग्याचं गंभीर वास्तव, दहापैकी नऊजणांची कॉलेस्टरॉलची पातळी सामान्य नाही, ICMR नं मांडली महत्त्वाची बाब



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *