मुंबई : मुंबईतील विना भोगवटा प्रमाणपत्र (OC Occupancy Certificate) असलेल्या हजारो इमारतींमधील लाखो रहिवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी समितीच्या बैठकीत अशा इमारतींसाठी आणण्यात आलेल्या ‘अभय योजने’च्या प्रस्तावाला (Abhay Scheme) बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबईतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओसीच्या समस्येतून नागरिकांची सुटका होणार आहे. या नव्या प्रस्तावानुसार, 17 नोव्हेंबर 2016 च्या आधीच्या धोरणात सुधारणा करून ही योजना आता अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्यात येणार आहे.
BMC OC Abhay Scheme : मंजूर नकाशा असलेल्या इमारतींना लाभ
या बैठकीत निवासी इमारतींसाठी पूर्वी असलेली 80 चौरस मीटरची जाचक अट किंवा मर्यादा आता पूर्णपणे हटवण्यात आली आहे. याऐवजी आता महापालिकेचा मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना ओसी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, आवश्यक ती वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) सादर केल्यानंतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक इमारतींनाही या अभय योजनेचा मोठा लाभ दिला जाणार आहे.
या बैठकीदरम्यान सभागृह नेते गणेश खणकर यांनी विकासकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. काही बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्या निष्काळजीपणाची किंवा चुकीची शिक्षा निष्पाप नागरिकांना भोगावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा जबाबदार बिल्डर आणि आर्किटेक्ट यांची नावे जाहीर करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे आणि भविष्यात त्यांच्या कोणत्याही बांधकाम प्रस्तावांना परवानगी देऊ नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
Occupancy Certificate Benefits : सर्वसामान्यांना काय फायदा होणार?
या नव्या अभय योजनेमुळे मुंबईकरांना अनेक मोठे फायदे मिळतील. अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतींना ओसी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच मुंबईतील रखडलेल्या किंवा रखडण्याची शक्यता असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना (Redevelopment Projects) यामुळे मोठी गती मिळणार आहे. ओसी नसल्यामुळे रहिवाशांवर नेहमीच महापालिकेच्या कारवाईची टांगती तलवार असायची, ती भीती आता कायमची कमी होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इमारतीला ओसी मिळाल्यामुळे फ्लॅट किंवा मालमत्तेची खरेदी-विक्री आणि हस्तांतरण करणे कायदेशीरदृष्ट्या अधिक सोपे होईल. बँकांकडून गृहकर्ज (Home Loan) किंवा इतर आर्थिक व्यवहार मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन हे व्यवहार सुलभ होण्यास मदत होईल. आवश्यक परवानग्या पूर्ण केल्यास याचा थेट दिलासा व्यावसायिक इमारतींनाही मिळणार असल्याने व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.
What is OC Abhay Scheme : ओसी अभय योजना म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचे तर, ओसी (Occupancy Certificate) म्हणजे इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशानुसार पूर्ण झाले असून ती राहण्यासाठी किंवा वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे महापालिकेकडून दिले जाणारे कायदेशीर प्रमाणपत्र होय. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बिल्डरने ओसी न घेतल्यामुळे नागरिक त्रस्त असतात.
यावर उपाय म्हणून ‘ओसी अभय योजना’ (Abhay Scheme) आणली आहे. याद्वारे अनेक वर्षांपासून ओसी नसलेल्या पात्र इमारतींना ठरावीक अटी व शर्तींवर ओसी मिळवण्याची एक विशेष आणि सुवर्ण संधी महापालिका देत आहे. बिल्डर किंवा आर्किटेक्ट यांच्या त्रुटींमुळे अडकलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र, ही योजना सर्वच इमारतींना आपोआप लागू होणार नाही. संबंधित इमारतीने किंवा सोसायटीने महापालिकेने ठरवलेले निकष आणि आवश्यक वैधानिक परवानग्या पूर्ण करणे बंधनकारक असेल.
ही बातमी वाचा :