Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा


कोल्हापूर : निवडणुकीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या गोकुळ दूध संघामध्ये मोठी घडामोड घडली आहे. गोकुळ दूध संघाचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय सुद्रिक यांनी राजीनामा दिला आहे. वाढत्या राजकीय दबावामुळे संजय सुद्रिक यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. संजय सुद्रिक यांच्या जागी प्रदीप मालगावे हे प्रशासक मंडळाचे नवे अध्यक्ष असतील.

गोकुळमध्ये लवकरच निवडणूक पार पडणार असून त्याआधी प्रशासक नेमण्यात आला आहे. गोकुळ दूध संघावर पाच सदस्यांचे प्रशासक मंडळ हे काम पाहत होतं. मात्र त्यापैकी या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय सुद्रिक यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता चार जणांचे प्रशासक मंडळ हा कारभार पाहणार असून प्रदीप मालगावे हे नवे अध्यक्ष असतील.

गोकुळवर नेमण्यात आलेल्या प्रशासकावरूनही मोठं राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक, अशा दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचं चित्र आहे. यातूनच आता प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय सुद्रिक यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. 

सतेज पाटील वि. महायुती अशी लढत

गोकुळमध्ये सध्या सतेज पाटील गटाची सत्ता आहे. मात्र गेल्यावेळी सतेज पाटलांसोबत निवडणूक लढवलेले हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांच्यासह अनेकजण सध्या महायुतीच्या गोटात आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विरुद्ध सतेज पाटील गट अशी निवडणूक रंगणार आहे. 

गेल्या वेळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी सगळ्या विरोधकांची मोट बांधून महादेवराव महाडिक यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवली होती. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचं दिसून आलं. त्यामुळेच गेल्या निवडणुकीवेळी सतेज पाटलांसोबत असलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आता महायुतीसोबत आहेत. 

कोणत्याही परिस्थितीमध्ये गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी चंग बांधल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच साम, दाम, दंड, भेद सर्व वापरलं जात असल्याचं चित्र आहे. 

दोन्ही गटांचे हजारो ठराव दाखल

दरम्यान, हसन मुश्रीफ गटाने 2 हजार 65, शिंदे गटाने 1 हजार 512, भाजप आणि महाडिक गटाने 1,431, कोरे गटाने 545 ठराव दाखल केले आहेत. सत्ताधारी सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने 1,851 ठराव दाखल केले आहेत. त्यामुळे आता हे ठराव एकत्रित केले तर 7,404 होत आहेत. मात्र गोकुळ दूध संघाचे पात्र ठरावांची संख्या फक्त 4,448 आहे. त्यामुळे आता हे वाढलेले ठरावधारक नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दुसरीकडे, गोकुळ निवडणुकीवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. गोकुळशी संबंधित 427 दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय विभागीय दुग्ध निबंधकांनी घेतला होता. या निर्णयामुळे संबंधित संस्थांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असल्याने सतेज पाटील गटाशी संबंधित संस्थांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्या आहेत. 

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *