उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला केला. एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील अनुपस्थितीवरुन टार्गेट केलं. “आज आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आपण पाहिलं असेल मिंधे सरकारपासून एक प्रथा सुरु झाली आहे. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, जे आता फोडाफोडी मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत. बाहेर सगळे रात्रीचे खेळ, बाकीचे खेळ जमतात त्यांना. पण सभागृहात बसून स्वत:च्या खात्याचा अभ्यास करुन उत्तर देता येत नाही”अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. “त्यांच्या खात्याचं नेहमी वाटपं होतं. राज्यमंत्री असून सुद्धा इतर मंत्र्यांना त्यांच्या खात्याचं वाटप केलं जातं. ठराविक अधिवेशन मंत्री नेमले जातात” यावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला.
“प्रश्न हा आहे की, एकाबाजूला मुख्यमंत्री सभागृहात बसून इतर मंत्री देखील बसून उत्तर देतात. त्यांची कोंडी करणारे प्रश्न आम्ही त्यांना विचारत असतो. जनतेचे प्रश्न आम्ही विचारतो. पण उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात. पण एक अकार्यक्षम मंत्री त्यांना त्यांच्या खात्याचा कार्यभार संभाळता येत नाही. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात म्हणून हाऊसमधून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांच्या सर्व खात्याचं वाटप केलं जातं” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
अशी पळवाट काढली नाही
“आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून 2019-2020 मध्ये असं झालं म्हणून सांगितलं गेलं. पण 2019-2020 मध्ये कधीच असं झालं नाही. कुठल्याही मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांनी अशी पळवाट काढली नाही. राज्यमंत्री असायचे त्यांनी उत्तरं दिली. जबाबदारी स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. रेकॉर्ड काढा. आमचे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री बाहेर पैशांचा खेळ खेळतात. त्यांनी जी खाती मागून, हट्टाने, रडून घेतली त्याची जबाबदारी स्वीकरुन उत्तरं द्यावी” अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.
उगाच खुर्चीवर बसून घाणेरडं राजकारण करु नका
“आम्ही व्यक्तिगत प्रश्न विचारत नाही, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो. विधानसभा अध्यक्ष 2019-2020 मध्ये असं होतं होतं हे खोट, चुकीचं बोलले. ते त्यांनी रेकॉर्डवरुन काढून टाकावं. उगाच खुर्चीवर बसून घाणेरडं राजकारण करु नये” असं आदित्य ठाकरे म्हणाले.