Aadesh Bandekar to do comeback: मराठी मनोरंजन विश्वात आजही असे काही कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’.

मराठी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारे लाडके ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार का, याबाबत सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंबा महोत्सवादरम्यान झी मराठीच्या आगामी कार्यक्रमासंदर्भात झी मराठीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पाठारे यांनी ‘दार उघड बये म्हणत भावोजी येणार की आणखी कोणी?’ असं म्हणत नवीन कार्यक्रमाचे संकेत दिले. त्यानंतर चर्चेला आणखी वेग आला आहे.
‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा भेटीला
मिळालेल्या माहितीनुसार, ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा येणार असल्याचं बोललं जातंय. या कार्यक्रमाशी संबंधित चर्चेमध्ये प्रेक्षकांच्या लाडक्या भावोर्जीचं म्हणजेच आदेश बांदेकर यांचं नावही समोर येत आहे. मात्र, याबाबत वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकं काय असणार, याबद्दल उत्सुकता कायम आहे.
Sai Tamhankar: ‘काय परिधान करावं आणि काय नाही; हा ज्याचा-त्याचा प्रश्न’, प्राजक्ता माळीच्या कान्स लुकवर स्पष्टच बोलली सई ताम्हणकर
दोन वर्षांपूर्वी ‘मुंटा’नं ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम पुन्हा येणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा कार्यक्रम पूर्वीच्या लोकप्रिय शैलीची आठवण करून देणारा असू शकतो. ‘होम मिनिस्टर’च्या सुरुवातीच्या काळात ज्या सहज, साध्या आणि घराघरांत आपलेपणा निर्माण करणाऱ्या शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती, त्याच धाटणीची झलक या कार्यक्रमात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.घरातील सदस्यांशी साधेपणानं संवाद साधणारे, त्यांच्यात मिसळून जाणारे आणि सामान्य माणसांच्या भावना जवळून मांडणारे भावोजी पुन्हा पाहायला मिळतील का, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
९७ वर्षीय फॅनला भेटण्यासाठी आदेश भावोजी पोहोचले सांगलीला !
दरम्यान, या कार्यक्रमाचा फॉरमॅट, प्रसारणाची तारीख किंवा वेळ याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऑगस्टच्या सुमारास कार्यक्रमाविषयी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी झी मराठीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पाठारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसंच यासंदर्भात आदेश बांदेकर यांच्याशीदेखील संपर्क साधला होता, परंतु ते एका कार्यक्रमाच्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.
