India vs Ireland T20 Series 2026 Update : अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 26 आणि 28 जून रोजी बेलफास्ट येथे भारत-आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच बेलफास्टमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे या मालिकेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेलफास्टमध्ये नेमकं काय घडलं? (BCCI On High Alert Belfast Attacks)
काही दिवसांपूर्वी बेलफास्टमध्ये एका चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण तापलं. त्यानंतर स्थलांतरित (इमिग्रंट) समुदायाविरोधात संताप उसळला आणि अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू झाली. हिंसाचारादरम्यान मुखवटे घातलेल्या आंदोलकांनी अनेक वाहनांना आग लावली, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ले केले. सार्वजनिक मालमत्तेचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. या घटनांमुळे बेलफास्टमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
BCCI ची वाढली चिंता (BCCI on India vs Ireland T20 Series)
या घडामोडींनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सतर्क झाले आहे. बीसीसीआयचे अधिकारी सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि सतत क्रिकेट आयर्लंडच्या संपर्कात आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. जर मालिकेपूर्वी परिस्थिती सामान्य झाली नाही, तर सामने बेलफास्टऐवजी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. मात्र, सामन्यांचे ठिकाण बदलायचे की नाही याचा अंतिम निर्णय क्रिकेट आयर्लंडकडेच असेल. त्यांच्या विनंतीनंतरच बीसीसीआय पुढील निर्णय घेईल.
क्रिकेट आयर्लंडचा 48 तासांचा अल्टिमेटम (India vs Ireland T20 Series 2026 Update)
दरम्यान, क्रिकेट आयर्लंडनेही परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. स्थानिक प्रशासन आणि प्रांतीय क्रिकेट संघटनांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. 14 जूनपासून सुरू होणाऱ्या आयरिश सीनियर कप आणि नॅशनल कप स्पर्धांच्या सामन्यांबाबत पुढील 48 तासांत निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयावरून परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. बोर्डाने स्पष्ट केले आहे की खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि प्रेक्षकांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील पावले उचलली जातील.
भारत-आयर्लंड मालिकेवर संकट?
सध्या तरी भारत-आयर्लंड टी-20 मालिका रद्द करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, बेलफास्टमधील हिंसाचार कायम राहिला किंवा सुरक्षा यंत्रणांनी धोका व्यक्त केला, तर सामने दुसऱ्या शहरात हलवले जाऊ शकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मालिकेच्या वेळापत्रकात बदल किंवा रद्द करण्याचाही पर्याय नाकारता येणार नाही. क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे बीसीसीआय आणि क्रिकेट आयर्लंड दोन्ही बोर्ड परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती सामान्य झाली तर नियोजित वेळापत्रकानुसारच भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचा थरार रंगण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला