Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: पुण्यातील (Pune News) बड्या व्यावसायिक कुटुंबाचा उच्चशिक्षित लेक केतन अग्रवालचा (Ketan Agrawal) पुण्याच्या (Pune Crime) लोहगड (Lohagad) किल्ल्यावरुन पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली. पण, त्यानंतर जे समोर आलं ते मात्र अख्खा देश हादरवणारं होतं. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात हादरवणारं सत्य समोर आलं. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालंय. तसेच, केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) हिला आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या. अशातच आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Bollywood Singer Amaal Mallik) यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन घटनेवर संताप व्यक्त केलाय. तसेच, नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते, असं म्हटलंय.
प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Amaal Mallik) यानं आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट केलीय. अमालनं लिहिलंय की, फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो, कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? तसेच, पुढे बोलताना अमालनं सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना राक्षस म्हणून संबोधलं आहे. तसेच, अमालनं आपल्या ट्वीटमधून इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? असा प्रश्नही उपस्थित केलाय.
WHY 💔 pic.twitter.com/9vM7lTC9po
— Amaal Mallik (@AmaalMallik) June 29, 2026
गायक अमाल मलिक नेमकं काय म्हणाला?
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अमाल मलिक यानं सोशल मीडियावर पोस्ट केलीय. पोस्टमध्ये अमाल मलिकनं म्हटलंय की, “केतनला जीवे मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एकदा नाही म्हणाली असती तरी पुरे झालं असतं. दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे, हे सांगितलं पाहिजं होतं. हे सांगून पण त्यानं ऐकलं नाही आणि तो मागेच लागला असता तर त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगायचं होतं. कुटुंबाला यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजं होतं. या जगात कुठेही एका स्वतंत्र, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही…”
फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो : अमाल मलिक
“भारतातील कायदे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी चांगले आहेत, पण व्यवस्थेचा गैरवापर आणि हेराफेरी का करायची? फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो. कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? एक जीव गेला, कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस…”, असं अमाल मलिकनं म्हटलंय.
नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते : अमाल मलिक
गायक अमाल मलिक यानं आणखी एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलंय की, “वर्षानुवर्षे महिलांवर पुरुषांमुळे खूप अत्याचार झाले आहेत आणि त्यांनी खूप सहन केलंय. त्यासाठी मी सर्व महिलांची माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. अत्याचाराविरोधात लढा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण हा लढा फक्त नीच लोकांसाठी मर्यादित ठेवा. जे लोक स्त्रियांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात आणि त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवतात, अशा लोकांविरोधात आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणारे लोकही तितकेच घातक असतात. पण, प्रत्येक गोष्टीला ‘टॉक्सिक’ असं नाव दिल्यामुळेच खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते. भावनांपेक्षा पैशांना अधिक महत्त्व देणंही टॉक्सिक आहे. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं टॉक्सिक आहे. तसंच ज्याच्यासह आयुष्यभर राहण्याचा कोणताही हेतू नाही, अशा व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणे हे देखील तितकंच टॉक्सिक आहे…”
इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? : अमाल मलिक
पुढे अमालनं लिहिलंय की, “तुम्हाला वाटतं का पुरुषांना शांततेशिवाय दुसरं काही हवं असतं? शारीरिक संबंध तर सगळीकडे सहज उपलब्ध आहेत. पण, तुमच्या गरजा आणि इच्छांची मोठी यादी असते, विशेषतः जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा खूप अपेक्षा ठेवल्या जातात. इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? तुम्ही लोणावळ्यातील एका सुंदर हनिमूनमध्येही आनंदी राहू शकता, पण तुम्हाला खरं प्रेम असेल तर तो परदेशामध्ये घेऊन जाईल असं वाटतं… आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य पाहिजे असतं हे समजू शकतो, पण फक्त मालदीवमध्ये खऱ्या प्रेमाची भावना वेगळी असते का? या माणसाबरोबर जे झालं आहे, ते नव्हतं व्हायला पाहिजे. त्याचं हसणं आणि त्याचे डोळे बघा… तिच्याशी लग्न करण्यासाठी तो किती आनंदी होता ते बघा. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा