Last Updated:
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश आपल्या पेनाची निब (टोक) तोडतात. पण हे टोक का तोडलं जातं? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.
पुणे : नसरापूरात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत अवघ्या दोन महिन्यांच्या आत यावर निकाल देण्यात आला. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताच न्यायाधीश आपल्या पेनाचं टोक मोडतात.
एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावणं हे कोणत्याही न्यायाधीशासाठी सोपं नसतं. पण नसरापूरसारख्या अशा काही भयंकर प्रकरणांमध्ये आरोपीला सर्वात कठोर शिक्षा देण्याशिवाय दुसरा उपायही उरत नाही. त्यामुळे सगळे पुरावे आणि घटनेचं गांभीर्य पाहून न्यायाधीशांना हा कठोर निर्णय द्यावा लागतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश आपल्या पेनाची निब (टोक) तोडतात. पण हे टोक का तोडलं जातं? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.
फाशीची शिक्षा सुनावल्यावर पेनाचं टोक तोडलं जातं, असं करण्याला सिम्बॉलिक अॅक्ट म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा पेनाची निप 1949 मध्ये तोडली गेली होती. तेव्हा महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथूराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
फाशीची शिक्षा सुनावताच पेनाचं टोक तोडण्यामागे अनेक कारणं आहेत.
मानसिक वेदना व्यक्त करणे: याचं पहिलं कारण असं सांगितलं जातं, की न्यायाधीशांसाठी कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणं फार कठीण असतं. ते पेनाची निब तोडून शिक्षा सुनावताना आतून होत असलेल्या त्रासाला व्यक्त करतात.
पुन्हा असा गुन्हा घडू नये ही भावना: यासोबतच आता त्यांना पुन्हा अशाप्रकारची शिक्षा सुनावण्याची वेळ येऊ नये. म्हणजेच अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा घडू नये, असाही यामागचा उद्देश असतो.
स्वतः न्यायाधीशही निर्णय बदलू शकत नाही: असंही म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाचं टोक तोडतात कारण, त्यांचा हा निर्णय बदलला जाऊ नये. उच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय न्यायाधीशांचा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. इतकंच काय तर स्वत: न्यायाधीशही नाही. त्यामुळेच पेनाचं टोक तोडून न्यायाधीश हे स्पष्ट करतात की, फाशीची शिक्षा सुनावल्यावर ती बदलली जाऊ शकत नाही.
तो पेन पुन्हा वापरला जाऊ नये: यातीलच आणखी एक कारण म्हणजे, न्यायाधीश पेनाचं टोक यासाठी तोडतात कारण तो पेन पुन्हा वापरला जाऊ नये. कारण त्या पेनाने एका व्यक्तीचा मृत्यू लिहिलेला असतो.
Pune,Maharashtra
नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंड; फाशीची शिक्षा सुनावताच न्यायाधीश का तोडतात पेनची ‘निब’? ‘हे’ आहे कारण
