दिव्या पुगावकर, मेघन जाधव, अक्षय घरतImage Credit source: Instagram
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि मेघन जाधव ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. या मालिकेत दोघं जयंत आणि जान्हवीच्या भूमिकेत आहेत. जयंत त्याची पत्नी जान्हवीचा खूप मानसिक छळ करतो. त्याची पझेसिव्ह वृत्ती प्रेक्षकांनाही खूप खटकते. तर दिव्या साकारत असलेली जान्हवी ही खूप साधी आणि सोज्वळ असते. पतीच्या छळाला वैतागून ती त्याला धडा शिकवण्याचं ठरवते. मालिकेतील या दोघांच्या जोडीवर आणि स्वभावावर आता दिव्याचा खऱ्या आयुष्यातील पती अक्षय घरतने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
मालिकेत जरी जयंत जान्हवीबाबत पझेसिव्ह असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र हे चित्र उलटं आहे. दिव्या ही अक्षयबाबत खऱ्या आयुष्यात खूप पझेसिव्ह आहे. खुद्द अक्षयनेच याचा खुलासा केला आहे. “माझं तिच्यावर जितकं प्रेम आहे, त्यापेक्षा तिचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे ती खूप पझेसिव्ह सुद्धा आहे. कधी कधी त्याचा मला त्रास होतो, पण ठीक आहे”, असं अक्षयने सांगितलं. त्यावर दिव्या सांगते, “तो माझ्याबाबत अझिबात पझेसिव्ह नाही.”
दिव्या पुगावकर-अक्षय घरत
मालिकेतील सध्याच्या ट्रॅकविषयी बोलताना दिव्या पुढे म्हणाली, “जयंत जान्हवीला त्रास देत होतो, तेव्हा अक्षयला काही वाटत नाही. पण आता मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे, ज्यामध्ये जान्हवी त्याला धडा शिकवते, ते पाहून त्याला वाईट वाटतं. त्याला जयंतपेक्षा मेघनची खूप दया येते. पण अक्षय मला माझ्या कामाबद्दलही प्रतिक्रिया देत असतो. कुठला सीन आवडला नाही किंवा काही जमलं नाही, तर तो त्यात मला सल्लेसुद्धा देतो.”
फेब्रुवारी 2025 मध्ये दिव्याने अक्षय घरतशी लग्न केलं. तिचा पती अक्षय हा फिटनेस मॉडेल म्हणून काम करतो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसंच उद्योजक असं नमूद केलं आहे. तर दिव्या ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. याआधी तिने ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत ती श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची भूमिका साकारत आहे.